भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वढला; राज ठाकरेंची टीका

Raj Thackeray | मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना घडत असून, यात दोन निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या गंभीर परिस्थितीवर विधिमंडळाच्या आवारात भाजप आमदारांनी हास्यविनोद केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत परखड सवाल केले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे? आणि तुम्ही तू पसरू देताय? अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होते! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा
पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर ऑनलाइन भरणाऱ्यांना ४ टक्के सवलत
तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असे महाराष्ट्राला वाटत होते, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेव्हा होतात आणि त्यावर जेव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.





