PF मधील 100 टक्के रक्कम कधी काढता येते? 75 टक्के कधी मिळते? जाणून घ्या महत्त्वाचे नियम

EPFO PF Withdrawal Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार आहे. कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांच्या योगदानातून तयार होणाऱ्या या निधीवर दरवर्षी व्याजही मिळते. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांमध्ये असा गैरसमज असतो की, गरज पडल्यास कधीही संपूर्ण PF काढता येतो. प्रत्यक्षात EPFO च्या नियमांनुसार नोकरी सुरू असताना 100 टक्के PF काढण्याची परवानगी नसते.
100 टक्के PF कधी काढता येतो?
सध्याच्या नियमांनुसार, कर्मचारी 58 वर्षांचे वय पूर्ण झाल्यानंतर आपल्या EPF खात्यातील संपूर्ण रक्कम काढू शकतो. याशिवाय, एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेल्यानंतर तो बेरोजगार राहिल्यासही ठराविक अटींनुसार संपूर्ण PF काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
EPFO च्या नियमानुसार, नोकरी गेल्यानंतर एक महिना पूर्ण झाल्यावर कर्मचारी आपल्या PF खात्यातील 75 टक्के रक्कम काढू शकतो. जर दोन महिने किंवा त्याहून अधिक काळ नवीन नोकरी मिळाली नाही, तर उर्वरित 25 टक्के रक्कमही काढण्याची परवानगी दिली जाते. बेरोजगारीच्या काळात आर्थिक मदत मिळावी, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा – भारतीय संघातील कोणत्या खेळाडूची दहशत आयर्लंडच्या टीममध्ये पसरलीये? आयरिश खेळाडूने बोलून दाखवलं
नोकरी बदलताना PF काढू नका
अनेक कर्मचारी नोकरी बदलल्यानंतर जुना PF काढून घेतात. मात्र, EPFO याची शिफारस करत नाही. संस्थेच्या मते, युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) च्या माध्यमातून जुना PF नवीन नियोक्त्याच्या खात्यात हस्तांतरित करणे अधिक फायदेशीर ठरते.
यामुळे PF वर सातत्याने व्याज मिळत राहते आणि निवृत्तीच्या वेळी मोठा निधी तयार होण्यास मदत होते. वारंवार PF काढल्यास भविष्यातील बचतीवर परिणाम होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये कर (Tax) देखील लागू शकतो.
नोकरी सुरू असताना संपूर्ण PF काढता येत नसला, तरी EPFO काही महत्त्वाच्या कारणांसाठी आंशिक रक्कम काढण्याची परवानगी देतो.
खालील कारणांसाठी PF मधून पैसे काढता येतात:
उच्च शिक्षण
विवाह
घर खरेदी
घर बांधकाम
गृहकर्जाची परतफेड
गंभीर आजारावरील उपचार
प्रत्येक कारणासाठी पात्रता आणि रक्कमेची मर्यादा वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.
संपूर्ण PF काढण्यापूर्वी विचार करा
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, EPF ही केवळ बचत योजना नसून निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेली दीर्घकालीन गुंतवणूक आहे.
यामध्ये कर्मचाऱ्याच्या योगदानासोबत नियोक्त्याचा वाटा आणि वार्षिक व्याजही जमा होत राहते. त्यामुळे अत्यावश्यक गरज नसल्यास संपूर्ण PF काढण्याऐवजी तो खात्यातच ठेवणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे निवृत्तीच्या वेळी मोठा निधी तयार होतो आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत राहते.





