‘NEET’नंतर आता ‘टीईटी’चा पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा तडकाफडकी रद्द!

TET Exam Paper Leak | देशभरात सध्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच, आता महाराष्ट्रातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यभरात उद्या म्हणजेच २८ जून रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ही परीक्षा तडकाफडकी रद्द (स्थगित) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उद्या रविवार, २८ जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर ठाणे परिसरात फुटल्याची बाब उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच शिक्षण विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेने तातडीने पावले उचलली. हा पेपर नेमका कोणत्या यंत्रणेद्वारे आणि कसा लीक झाला, याबाबत गुप्तता पाळली जात असून कसून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा
एमआयटी कॉलेज आळंदीतील चार विद्यार्थ्यांची ‘सायबर वॉरियर्स’ म्हणून निवड
२ लाख २६ हजार परीक्षार्थींना मोठा फटका
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (MSCE) या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून तब्बल २ लाख २६ हजार शिक्षक उमेदवार उद्या हा टीईटीचा पेपर देणार होते. मात्र, परीक्षेच्या अवघ्या काही तास आधीच पेपर लीक झाल्याचे समोर आल्यामुळे ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागली आहे. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो उमेदवारांमध्ये तीव्र संताप आणि निराशेचे वातावरण पसरले आहे.

नवी तारीख लवकरच जाहीर होणार!
परीक्षा परिषदेकडून अधिकृत परिपत्रक जारी करून परीक्षा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, उमेदवारांनी गोंधळून न जाता अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून, परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बातमी अपडेट होत आहे..





