व्हेनेझुएलात महाभयंकर भूकंप! पत्त्यासारख्या कोसळल्या इमारती, रस्ते दुभंगले; प्रचंड जीवितहानीची भीती

Venezuela Earthquake 2026 | दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशामध्ये बुधवारी रात्री निसर्गाचे महाभयंकर तांडव पाहायला मिळाले. अवघ्या ३९ सेकंदांच्या अंतराने झालेल्या दोन अत्यंत शक्तिशाली ‘जुळ्या’ भूकंपांनी (Twin Earthquakes) संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. रिक्टर स्केलवर ७.२ आणि ७.५ तीव्रतेच्या या महाभयंकर भूकंपांमुळे राजधानी कराकससह अनेक शहरे अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. या आपत्तीत मुख्य रस्ते मधोमध दुभंगले असून अनेक बहुमजली इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत.
‘युएस जिओलॉजिकल सर्व्हे’ (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला धक्का रात्री १०:०४ वाजता सॅन फेलिप शहराजवळ बसला, ज्याची तीव्रता ७.२ एवढी होती. या पहिल्या धक्क्यामुळे घाबरलेले नागरिक जीवाच्या आकांताने घराबाहेर धावत असताना आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, अवघ्या ३९ सेकंदांनंतर युमारे शहराजवळ ७.५ तीव्रतेचा दुसरा आणि अधिक शक्तिशाली मुख्य धक्का बसला. हे दोन्ही मुख्य भूकंप एकमेकांपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर झाले. या भूकंपांचे धक्के इतके तीव्र होते की, शेजारील देश कोलंबियाची धरतीही यामुळे हादरली.
हेही वाचा
स्विमिंग पूलचे पाणी रस्त्यावर; रस्ते दुभंगले
भूकंपानंतरचे अनेक अंगावर काटा आणणारे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये विमानतळावरील शेकडो प्रवासी जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये कराकस मधील एका बहुमजली इमारतीच्या छतावर (Rooftop) असलेला स्विमिंग पूल भूकंपाच्या धक्क्याने रिकामा होऊन त्याचे पाणी थेट जमिनीवर धबधब्यासारखे कोसळताना दिसत आहे. शहरांमधील मुख्य महामार्गांना मोठमोठे तडे गेले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मृत्यूचा आकडा १ लाखांवर जाण्याची भीती
USGS ने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, या महाभयंकर नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रचंड प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. ढिगाऱ्यांचे साम्राज्य पाहता या भूकंपांमुळे मृत पावलेल्यांचा आकडा १०,००० ते तब्बल १,००,००० च्या दरम्यान असू शकतो, अशी भीती वर्तवण्यात आली आहे. व्हेनेझुएलाचे अंतर्गत मंत्री डीओस्डाडो कॅबेलो यांनी सरकारी टेलिव्हिजनवरून माहिती देताना सांगितले की, “राजधानी कराकसमध्ये अनेक इमारती आणि घरे कोसळली आहेत. प्रशासन सध्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेत असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन पथकांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.”






