Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

महाराष्ट्रातील सात मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनातील ‘गणतंत्र मंडप’ येथे आयोजित या समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन , प्रधान मंत्री नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह अन्य केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.

पद्म पुरस्कार वितरणाच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील 65 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील मान्यवरांपैकी प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 हून अधिक भाषांमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक गीते गाऊन त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.

हेही वाचा –  ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्मा यांनी भारतीय क्रिकेटला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला. भारतातील नवजात शिशुवैद्यकशास्त्राच्या अग्रणी तज्ज्ञांपैकी एक असलेल्या डॉ. फर्नांडिस यांनी 1989 मध्ये मुंबईतील सायन रुग्णालयात आशियातील पहिली मानवी दूध बँक सुरू केली. अकाली आणि दुर्बल नवजात बालकांचे प्राण वाचविण्यात त्यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे.

वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून तयार होणारे सुमारे 10 फूट लांबीचे तारपा वाद्य वाजविण्याच्या त्यांच्या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले.

अभिनेते, पटकथा लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक आर. माधवन यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘अलैपायुथे’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘थ्री इडियट्स’, ‘तनू वेड्स मनू’, ‘विक्रम वेधा’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली आहे. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली.

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये चार दशकांहून अधिक काळ त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्यावतीने हा पुरस्कार त्यांचे बंधू अरविंद मामनिया यांनी स्वीकारला.

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. माझगाव डॉकमध्ये नोकरी करत असताना अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून त्यांनी 1992 मध्ये भावांसह ‘दास ऑफशोअर’ कंपनीची स्थापना केली. आज ही कंपनी देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी एकूण 131 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कारार्थींमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button