मनुवादाला संपवण्याचे बळ ज्योतिबा फुलेंच्या विचारात – शरद पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/1-11.jpg)
पुणे – आज प्रतिगामी विचार वेगवेगळ्या माध्यमातून समाजात पसरवले जात आहेत. सत्तेशी संबंधीत लोकांकडून मनुचे पुतळे बसविले जात आहेत. मनुवादाचा विचार अजुनही समाजातील अधिकार पदावर काम करणार्यांच्या डोक्यातून गेलेला नाही. मनुवादाच्या या विचारांना संपवण्याचे बळ ज्योतिबा आणि सावित्रीबाईं फुले यांच्या विचारात असून फुलेंचा विचार वाढविणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते शरद पवार यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करून गैरविण्यात आले. यावेळी पवार बोलत होते. गंज पेठेतील महात्मा फुले यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री छगन भुजबळ, सीतामढीचे खासदार रामकुमार शर्मा, खा. अँड. वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब देवकते, पंकज भुजबळ, समीर भुजबळ उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार डॉक्टरेट व इतर पुरस्कारांपेक्षा वेगळा आणि महत्त्वाचा आहे. या पुरस्कारामागे फुले दाम्पत्यांचा समतेचा विचार आहे. ज्यावेळी समाजात विसमतेचे वारे वहात होते, त्या वेळी फुले दांपत्यांनी समता, न्याय प्रस्थापित करण्याचे काम केले. महात्मा फुले आधुनिकतेचे आणि विज्ञानाचे पुरस्कर्ते होते. शेतीला अधुनिकतेची जोड देण्याचे जे आवाहन आज आपण करत आहोत, ते महात्मा फुलेंनी दीडशे वर्षापूर्वी केले होते. सध्या समाजात वाढत असलेला मनुवाद रोखण्याचे काम शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारातूनच केले जाणार आहे, त्यामुळे हा विचार प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे अाहे.