तारीख ठरली; ‘या’ दिवशी संसदेकडून ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात सामील झाल्याची होणार अधिकृत घोषणा

Shivsena : शिवसेनेच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेबाबत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा संसदेकडून शनिवारी (20 जून) करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वृत्तानुसार, संबंधित सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वाक्षरीयुक्त पत्र सादर केले आहे. या पत्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भीती व्यक्त करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. हे पत्र सुमारे 48 तासांपूर्वी सादर करण्यात आले असले तरी त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानंतर 20 जून रोजी शिंदे गटाकडून या घडामोडींची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच दिवशी संसदेकडून जारी होणाऱ्या बुलेटिनमध्ये संबंधित सहा खासदारांचे शिंदे यांच्या शिवसेनेत विलिनीकरण झाल्याची नोंद करण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा – भोसरीत लांडगेनगर येथील वीज समस्येचा प्रश्न अखेर सुटला!
दरम्यान, या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडून ठाकरे गटाच्या नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता असली तरी अंतिम निर्णय अध्यक्षांचाच असेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
गुरुवारी दिल्लीत झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाच्या व्हीपकडे दुर्लक्ष करून सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. बैठकीला केवळ संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चार खासदार उपस्थित होते.
अनुपस्थित खासदारांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
या घडामोडींनंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले. तसेच, बंडखोरांविरोधात आता ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बंडखोरी करणाऱ्या खासदारांची नावे –
संजय जाधव (परभणी)
संजय देशमुख (यवतमाळ- वाशिम)
नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)
या घडामोडींमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लोकसभा पातळीवर मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.





