पिंपळे सौदागरमध्ये १००० नागरिकांना मोफत NCMC कार्डांचे वाटप
भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
नागरिकांचा प्रवास अधिक डिजिटल, सुलभ आणि गतीमान व्हावा या उद्देशाने उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथे १००० नागरिकांना मोफत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) वाटप करण्यात आले. रविवार, १४ जून २०२६ रोजी फाउंडेशनच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेला हा विशेष उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास उद्योजक विजयशेठ जगताप यांच्यासह आपल्या विशेष उपस्थितीत लाभार्थ्यांना NCMC कार्डांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेस, मेट्रो तसेच स्थानिक बस सेवांमध्ये उपयोगी ठरणारे हे कार्ड नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
‘नागरिकांसाठी डिजिटल व सुलभ प्रवास व्यवस्थेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल’ या संकल्पनेतून उन्नती सोशल फाउंडेशनने हा भव्य कॅम्प आयोजित केला होता. वाढत्या डिजिटल युगात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक प्रभावी वापर करता यावा आणि नागरिकांना आधुनिक सुविधांचा लाभ मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी उन्नती सोशल फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. “उन्नती सोशल फाउंडेशन आणि सौ. कुंदाताई भिसे यांनी नेहमीच पिंपळे सौदागरमधील नागरिकांच्या गरजा ओळखून तंत्रज्ञानाधारित आणि जनोपयोगी उपक्रम राबवले आहेत. हा उपक्रम शहरातील इतर भागांसाठीही प्रेरणादायी व आदर्श ठरेल,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या प्रसंगी नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे, नगरसेविका सौ. अनिताताई काटे, पवना सहकारी बँकेचे संचालक श्री जयनाथशेठ काटे, श्री संजयशेठ भिसे, श्री कैलासशेठ कुंजीर, पिंपळे सौदागरमधील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे नागरिकांना आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी जोडण्यास मदत होणार असून डिजिटल व्यवहारांना चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“आजच्या डिजिटल युगात नागरिकांना आधुनिक सुविधांशी जोडणे ही काळाची गरज आहे. उन्नती सोशल फाउंडेशनने १००० नागरिकांना मोफत NCMC कार्ड उपलब्ध करून देत डिजिटल आणि सुलभ प्रवासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या कार्डमुळे नागरिकांना एसटी, मेट्रो आणि स्थानिक बससेवांचा वापर अधिक सोयीस्कर पद्धतीने करता येणार आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून शहरातील इतर भागांसाठीही प्रेरणादायी ठरेल.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.





