Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील पहिले संविधान भवन उभारणीच्या कामाला गती

सीमाभिंतीसाठी सुधारित खर्चास स्थायी समितीची मंजुरी

– आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहरात साकार होत असलेल्या देशातील पहिल्या संविधान भवनाच्या उभारणीच्या कामाला आणखी गती मिळाली आहे. संविधान भवन व विपश्यना केंद्र (टप्पा क्र. १) प्रकल्पाच्या सिमाभिंतीच्या सुधारित कामासाठी आवश्यक वाढीव खर्चास स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या “क” प्रादेशिक कार्यालयांतर्गत विशेष योजना लेखाशिर्षाकाखाली संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्याच्या कामास प्रशासक ठराव क्र. ६५१, दिनांक ३० जुलै २०२४ अन्वये २०० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार सिमाभिंतीच्या कामासाठी २ कोटी ५२ लाख ४८ हजार ४७७ रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. पुढे स्थायी समिती ठराव क्र. ४३२७, दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ नुसार २ कोटी १० लाख ७ हजार ९१७ रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती.

मात्र, संविधान भवनासाठी ताब्यात आलेल्या भूखंडाचा परिसर अत्यंत उंच-सखल असून काही भागात दलदल व काळ्या मातीचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मूळ अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेल्या ३ मीटर अंतरावरील कॉलम फुटिंग पद्धतीने सिमाभिंत उभारणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर जमिनीच्या पातळीपर्यंत मजबूत रिटेनिंग वॉल आणि त्यावर आरसीसी परदी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड’ दर्शन आता अवघ्या ५०० रुपयांत होणार!

या बदलामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होणार असून सुधारित खर्चासाठी स्थायी समितीची मंजुरी आवश्यक होती. त्यानुसार सिमाभिंतीच्या कामासाठी ३ कोटी ९० लाख २८ हजार ३४० रुपयांचा वाढीव खर्च प्रस्तावित करण्यात आला. परिणामी मटेरियल टेस्टिंग, रॉयल्टी, एक टक्का लेबर इन्शुरन्स, जीएसटी (१८ टक्के) तसेच भाववाढ यांसह एकूण खर्च ७ कोटी ४५ लाख ६ हजार ३५० रुपये इतका होणार आहे.

स्थायी समितीने या सुधारित खर्चास मान्यता दिल्यामुळे संविधान भवनाच्या उभारणीसाठी आवश्यक पायाभूत कामांना वेग मिळणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून साकार होणारे हे संविधान भवन नागरिकांमध्ये भारतीय राज्यघटनेविषयी जागरूकता निर्माण करणारे तसेच अभ्यास, संशोधन आणि सामाजिक प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाच्या मूल्यांचा प्रसार आणि जतन करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमध्ये आदर्श संविधान भवन उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी, अभ्यासिका आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संविधान भवन हे केवळ एक वास्तू नसून, भावी पिढ्यांसाठी संविधानाच्या विचारांचा प्रेरणादायी केंद्रबिंदू ठरेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय आणि आर्थिक पाठबळ देण्यास स्थायी समिती कटिबद्ध आहे.”

– अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती.

“भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, न्याय आणि बंधुतेची दिशा दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन उभारण्यात येणारे संविधान भवन हे सामाजिक जागृती आणि बौद्धिक विकासाचे केंद्र बनेल. विशेषतः विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि तरुण पिढीला संविधानाचा सखोल अभ्यास करण्यासाठी येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात मोलाची भर घालणारा ठरेल.”

– सारिका गायकवाड, सदस्या, स्थायी समिती.

“पिंपरी-चिंचवड शहराला देशातील पहिले संविधान भवन लाभत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. संविधान भवनासोबत उभारण्यात येणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी ज्ञान, संशोधन आणि वैचारिक प्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ निर्माण करेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी आणि प्रगतिशील विचारांचा वारसा जपणारा हा प्रकल्प शहराच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक ओळखीला नवे परिमाण देणारा ठरेल. आगामी काळात हे केंद्र राष्ट्रीय स्तरावरील आकर्षणाचे ठिकाण बनेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

-डॉ. सुहास कांबळे, सदस्य, शहर सुधारणा समिती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button