अभिनेते जास्त कमावतात की एन्फ्लुएन्सर? अमेय वाघने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, “आठवड्याला आयफोन…”

Amey Wagh on influencers income is more than actors : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा त्याच्या मजेशीर अंदाज आणि वास्तवदर्शी अभिनयासाठी ओळखला जातो. नाटकांपासून सुरू झालेला अमेय वाघचा प्रवास मालिका, चित्रपट आणि ओटीटीपर्यंत पोहोचला आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरांमध्ये पोहोचलेल्या अमेयचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेता म्हणून अमेयने विविध आशयाच्या भूमिका साकारल्या असून, प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे. मात्र, आज सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये कलाकारांपेक्षा अधिक मानधन हे इन्फ्लुएन्सरला मिळत असल्याचे मत अमेय वाघने व्यक्त केले आहे.
अभिनेता अमेय वाघने ‘दॅट ऑड इंजिनीयर’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कलाकारांच्या मानधनाबद्दल मत व्यक्त केले आहे. यावेळी अमेयला कलाकार म्हणून किती पैसे कमावतो याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरपेक्षा कलाकारांना कमी पैसे मिळत असल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले.
अमेय वाघ म्हणाला की, यूट्यूब या माध्यमामध्ये जेवढा पैसा आहे ना तेवढे पैसे कलाकार कमवत नाहीत. यूट्यूबर हे खूप पैसे कमावतात. कारण- यूट्यूबर्सला पेमेंट डॉलर्समध्ये मिळते. एवढं अभिनेत्यांचं नशीब नाही, अशी खंत अमेय वाघने व्यक्त केली आहे.
हेही वाचा – ‘स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणार
पुढे अमेय म्हणाला की, सध्या यूट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर सर्वांत जास्त पैसे कमावत आहे. कोणते कलाकार खूप पैसे कमावत आहेत मला माहीत नाही; पण मी आठवड्याला आयफोन विकत घेऊ शकत नाही. एकच आहे, तोपण बायकोनं गिफ्ट दिलाय. प्रमोशन वगैरे करून चिरीमिरी कमवतो. मी हॉटेलमध्ये बोलावून पार्टी; नाही तर घरी बोलावून जेवण देऊ शकतो, असे मिश्कील अंदाजामध्ये त्याने उत्तर दिले आहे. त्याचबरोबर शाहरुख खानने दिलेल्या ५०० रुपयांचा उल्लेख करीत तेवढेच पैसे कमावले असल्याचे अमेय वाघ म्हणाला आहे.
मुलाखतीमध्ये अमेय वाघला सध्या इंडस्ट्रीमध्ये इन्फ्लुएन्सर वाढत असल्यामुळे कलाकारांना भीती वाटते का याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, याबद्दल भीती काही नाही. कारण- ज्याला आयुष्यामध्ये जे मिळणार असते, ते मिळत असते. पूर्वी नाटके सुरू असताना अचानक डेलीस्कोप सुरू झाले, तेव्हा नाटकातील कलाकारांना हेच वाटलेच असेल की, आता टीव्हीवरील कलाकारांना जास्त प्रसिद्धी आणि ओळख मिळते आहे. आता डेलीस्कोपनंतर ओटीटी आले आणि त्यानंतर आता शॉर्ट फॉरमॅट सुरू झाला आहे. त्यामुळे काळानुसार मनोरंजनाची पद्धत बदलत असते. काळ बदलत असतो आणि प्रत्येकाला पैसे कमावण्यासाठी काही ना काही साधन मिळून जाते, असे मत अभिनेता अमेय वाघने व्यक्त केले आहे.





