गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्सचा शिक्षक अभिमुखता कार्यक्रम ( Teacher’s Orientation ) उत्साहात संपन्न

पुणे : गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्सच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेला शिक्षक अभिमुखता (Teachers’ Orientation) कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. त्यानंतर पारंपरिक घाटोळी गीत सादर करण्यात आले. दीपप्रज्वलन, पूजन व मान्यवरांच्या सत्काराने कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात झाली.
गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्सचे आदरणीय अध्यक्ष मा. श्री. विनायक भोंगाळे सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिक्षकांना सकारात्मक विचार, समर्पण आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन ठेवून कार्य करण्याचा संदेश दिला. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित शिक्षकांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
हेही वाचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय! देशातील बसप्रवास आता अधिक सुरक्षित

कार्यक्रमात नगरसेविका सौ. कविताताईं भोंगाळे पाटील यांनी शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत वाचन, आत्मविकास आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच “Read to Lead” या उपक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वाचन ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली असून नियमित वाचनामुळे ज्ञान, विचारशक्ती, भाषा कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढतो, असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः आदर्श निर्माण करावा तसेच विविध वाचन उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती अंजली भागवत मॅडम तसेच विपणन प्रमुख मा. श्री. शैलेंद्र सिंग यांनी शिक्षकांना संस्थेचे नियम, कार्यपद्धती, शिस्त, जबाबदाऱ्या आणि आगामी शैक्षणिक वर्षातील अपेक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व शिक्षकांना आनंदी मनाने, जबाबदारीची जाणीव ठेवून आणि संघभावना जोपासत कार्य करण्यासाठी प्रेरित केले.
यावेळी विविध विभागप्रमुखांनी शैक्षणिक नियोजन, प्रशासन, विद्यार्थी सुरक्षा, अध्यापनातील गुणवत्ता, शालेय उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांनी नवीन शैक्षणिक वर्ष यशस्वी, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी समर्पित करण्याचा संकल्प व्यक्त केला. या अभिमुखता कार्यक्रमामुळे शिक्षकांमध्ये उत्साह, सकारात्मकता आणि नवचैतन्य निर्माण झाले.





