Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन

Pahlaj Nihalani | बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निहलानी हे गेल्या काही काळापासून ‘लिव्हर सोरायसिस’ (यकृताचा आजार) या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

पहलाज निहलानी यांनी १९८२ मध्ये ‘हथकडी’ या चित्रपटातून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून गोविंदा आणि चंकी पांडे यांसारख्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये पहिला मोठा ब्रेक दिला. अभिनेता गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे आणि व्यावसायिक संबंध होते.

‘आँखे’ आणि ‘शोला और शबनम’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट

त्यांच्या निर्मितीखाली बनलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरले. यामध्ये गोविंदा आणि चंकी पांडे स्टारर ‘आँखे’ आणि गोविंदा-दिव्या भारती जोडीचा ‘शोला और शबनम’ हे चित्रपट त्या काळी ब्लॉकबस्टर ठरले होते. याशिवाय ‘इल्जाम’, ‘अंदाज’ अशा अनेक हिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. २०१२ मध्ये त्यांनी गोविंदाला मुख्य भूमिकेत घेऊन ‘अवतार’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.

हेही वाचा

पीसीयुची औद्योगिक विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल : कुलपती हर्षवर्धन पाटील

२९ वर्षे असोसिएशनचे अध्यक्षपद; बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध

पहलाज निहलानी हे चित्रपटसृष्टीतील संघटनात्मक कामातही प्रचंड सक्रिय होते. ‘असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स’ या अग्रगण्य संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी सलग २९ वर्षे सांभाळले होते. अखेर २००९ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. आपल्या बेधडक आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी ते सिनेसृष्टीत ओळखले जात असत.

वादळी ठरलेली सेन्सॉर बोर्डाची कारकीर्द

२०१४ मध्ये देशात सत्तापालट झाल्यानंतर पहलाज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या (CBFC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची ही कारकीर्द प्रचंड वादळी आणि चर्चेत राहिली. चित्रपटांमधील विविध कट आणि नियमांमुळे अनेक चित्रपट निर्मात्यांशी त्यांचे वाद झाले. अखेर २०१७ मध्ये त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. पहलाज निहलानी यांच्या निधनामुळे बॉलिवूडने एक शिस्तप्रिय, मार्गदर्शक आणि अनेक कलाकारांचे भविष्य घडवणारा ज्येष्ठ निर्माता गमावला आहे. सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button