Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘बंडखोरांनी वरिष्ठांशी बोलून उमेदवारी मागे घ्यावी’; रवींद्र चव्हाण

मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुक महायुती एकत्रितपणेच लढणार असून बंडखोर उमेदवारांनी वरिष्ठ नेत्यांशी बोलून उमेदवारी मागे घ्यावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) नेते राहुल शेवाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते सुनील तटकरे यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

संभ्रम टाळण्याकरिता महायुतीकडून यावेळी १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या उमेदवारांव्यतिरिक्त कुणालाही महायुतीचा पाठिंबा नसेल. त्यामुळे बंडखोरांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून तोडगा काढावा, असा निर्वाणीचा इशारा चव्हाण यांनी दिला. नाराज असलेल्यांविषयी सकारात्मक विचार बाळगून त्यांना भविष्यात महामंडळांवर किंवा समित्यांवर सामावून घेतले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

राज्यात विधान परिषदेच्या १७ जागांकरिता अर्ज मागे घेण्याचा गुरूवार हा शेवटचा दिवस आहे. महायुतीत राज्यात ठिकठिकाणी बंडखोरी उफाळून आलेली असल्याने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक झाली. त्यात संभ्रम टाळण्याकरिता महायुतीच्या १७ उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्याचे ठरले. पहिल्या पसंतीची मते महायुतीच्या उमेदवारालाच देणे अपेक्षित आहे. जे नाराज आहेत त्यांच्याशी चर्चा करून अर्ज मागे घेतले जातील. त्यामुळे १०० टक्के निवडणुकीचा निकाल महायुतीच्याच बाजूने लागेल, असा विश्वास चव्हाण यांनी केला.

पुणे आणि अहिल्यानगर येथे वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आयत्यावेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली गेल्याने उमेदवारी देण्याचे निकष काय, या प्रश्नावर, निवडून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी दिली गेल्याचे उत्तर चव्हाण यांनी दिले.

नाशिकमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) शत्रू क्रमांक एक असल्याने या ठिकाणी भाजपच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. यावर, त्यांनी कुणालाही पाठिंबा दिला तरी महायुतीच १०० टक्के निवडून येईल, असे उत्तर चव्हाण यांनी दिले.

हेही वाचा –  म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांची गेट वे ऑफ इंडियाला भेट

बंडखोरी कुठे?

  • छत्रपती-संभाजीनगर-जालना ही जागा भाजपच्या वाट्याला आल्यानंतर या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांचे पुत्र समीर सत्तार यांना बंडखोरी करत अर्ज भरायला लावला.
  • अमरावतीत भाजपचा उमेदवार असताना शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
  • भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या दोघाजणांसह भाजपच्या नेत्यानेही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
  • यवतमाळमध्ये शिवसेनेचा उमेदवार असताना भाजपच्या नितीन भुतडा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
  • विदर्भात अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या ठिकाणी अनेकांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.
  • कोकणातही महायुतीला नाराजांचा सामना करावा लागत आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार

  • नागपूर – डॉ. राजीव पोतदार
  • भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्णणकर
  • वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – अरूण लखानी
  • अमरावती – प्रविण पोटे
  • सोलापूर – राजेंद्र राऊत
  • अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे
  • जळगाव – नंदकिशोर महाजन
  • सांगली-सातारा – धैर्यशील कदम
  • नांदे़ – अमरनाथ राजूरकर
  • धाराशीव – लातूर-बीड – बसवराज पाटील
  • छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाठ
  • ठाणे- रविंद्र फाटक
  • यवतमाळ- दुष्यंत चतुर्वेदी
  • परभणी-हिंगोली – सईद खान
  • नाशिक – नरेंद्र दराडे
  • रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे
  • पुणे – विक्रम काकडे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button