कशिश प्राईड–अमृतवेल सोसायटी परिसरातील नागरिकांना दिलासा!
ड्रेनेज ओव्हरफ्लो समस्या अखेर मार्गी, महापालिकेची कार्यवाही

शहर सुधारणा समिती सदस्य डॉ. सुहास कांबळे यांचा पुढाकार
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
इंद्रायणीनगर प्रभाग क्र. ८: कशिश प्राईड आणि अमृतवेल सोसायटी परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली ड्रेनेज ओव्हरफ्लोची समस्या अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (मनपा) तातडीच्या कारवाईनंतर सोडवण्यात आली आहे.
सेक्टर क्रमांक ४ मधील कशिश प्राईड–अमृतवेल सोसायटीलगत असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये मुख्य ड्रेनेज चेंबरमधून सातत्याने सांडपाणी बाहेर पडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली होती.
हेही वाचा
सोसायटींमधील ओला कचरा संकलनाचा मुद्दा पेटणार!
ही बाब स्थानिक रहिवाशांनी शहर सुधारणा समितीचे सदस्य तथा नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने मनपा प्रशासनाशी संपर्क साधत उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यानंतर मनपाच्या जलनि:सारण आणि आरोग्य विभागाने घटनास्थळी जेटींग कम सक्शन मशीन पाठवून तातडीने काम सुरू केले.
या कारवाईदरम्यान ड्रेनेज लाईनमधील गाळ व कचरा काढून साफसफाई करण्यात आली, ओव्हरफ्लो होत असलेल्या चेंबरची दुरुस्ती करण्यात आली तसेच परिसरात निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवण्यात आली.
कारवाईनंतर परिसरातील सांडपाण्याचा निचरा सुरळीत झाला असून दुर्गंधी आणि आरोग्यधोका कमी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. दरम्यान, भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी नियमित देखभाल करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
“कशिश प्राईड–अमृतवेल सोसायटी परिसरातील ड्रेनेज समस्येबाबत नागरिकांनी तत्काळ आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही तातडीने मनपा प्रशासनाशी समन्वय साधला. नागरिकांचे आरोग्य आणि परिसराची स्वच्छता ही आमची सर्वोच्च जबाबदारी असून, अशा समस्या भविष्यात पुन्हा निर्माण होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर आमचा भर आहे.”
– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक तथा सदस्य, शहर सुधारणा समिती.





