अल्फासारख्या चित्रपटात आलिया भट्टसोबत ॲक्शन करताना बॉबी देओलला आला भन्नाट अनुभव

Bobby Deol had an amazing experience : बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव अतिशय खास असल्याचं सांगितलं आहे. हा चित्रपट एका अशा असॅसिनच्या ओरिजिन स्टोरीवर आधारित आहे, जिला मारण्यासाठीच तयार केलं गेलं आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असून शर्वरी ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दोन मुली मुख्य भूमिकेत असलेला आणि दमदार ॲक्शन करणारा असा चित्रपट भारतात बनतोय, ही खूपच भन्नाट गोष्ट असल्याचं बॉबीने म्हटलं आहे. तसेच प्रेक्षक अल्फा ला भरभरून प्रेम देतील, अशी आशाही त्याने व्यक्त केली.
बॉबी म्हणाला, “रणबीर आणि आलिया हे दोघेही मला खूप आवडतात आणि मला नेहमीच त्यांच्यासोबत काम करायचं होतं. रणबीरसोबत मी एनिमल केला आणि आता आलियासोबत अल्फा केलाय. दोघांसोबत काम करताना मला खूप मजा आली. भारतात अल्फा सारखा दोन मुलींना घेऊन बनवलेला एक्शन चित्रपट तयार होतोय, ही खूपच अप्रतिम गोष्ट आहे. अल्फा मला खूप आवडला कारण हा चित्रपट नवीन आहे, फ्रेश आहे आणि प्रेक्षकांना थिएटरमध्ये एक वेगळा व्हिज्युअल अनुभव देणारा आहे.”
हेही वाचा – ‘ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आलिया भट्टने या चित्रपटातील दमदार एक्शन सिक्वेन्ससाठी घेतलेली मेहनत पाहून बॉबी विशेष प्रभावित झाला. तो म्हणाला,“आलिया ही मी काम केलेल्या सर्वात मेहनती आणि प्रामाणिक कलाकारांपैकी एक आहे. ती प्रत्येक सीनसाठी पूर्ण तयारीनिशी सेटवर येते आणि प्रत्येक दृश्यात पूर्णपणे गुंतलेली असते. यापूर्वी तिने अशा प्रकारची एक्शन कधीच केलेली नव्हती, पण शूटसाठी तिने केलेली तयारी पाहून मी थक्क झालो. एक्शन करणं खूप कठीण असतं, पण ती पूर्ण ताकदीने यात उतरली होती.”
तो पुढे म्हणाला,“आदि आणि दिग्दर्शक शिव रवैल यांची स्पष्ट कल्पना होती की एक्शन रॉ आणि वास्तववादी दिसायला हवी. त्यामुळे आमच्यासाठी हे शूट खूप कठीण होतं. पण आता आमच्याकडे असा चित्रपट तयार झाला आहे, जो प्रेक्षकांनी निवांत बसून मनापासून एन्जॉय करावा अशी आमची इच्छा आहे.” द रेल्वे मेन या जागतिक गाजलेल्या सीरीज चे दिग्दर्शक शिव रवैल यांनी अल्फाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अनिल कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अल्फा हा चित्रपट १० जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.





