Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणे

To The Point: कुणाला मिळणार विधान परिषदेवर संधी? : माजी आमदार विलास लांडे की माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष : भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीची आणखी एक रणनिती

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा प्रभाव वाढला आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता पुन्हा स्थापन करता येईल, अशी अपेक्षा असताना आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचंड प्रयत्न केले असतानाही राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले. ही निवडणुकत ‘‘अजितदादा विरुद्ध महेशदादा’’ अशी झाली. आता आगामी २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजपाचा प्रभावी चेहरा असलेल्या महेश लांडगे यांना रोखण्यासाठी अर्थात ‘डॅमेज’ करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार विलास लांडे किंवा माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येईल, अशी चर्चा आहे.

विशेष म्हणजे, विधान परिषदेवर काम करणाऱ्या नेत्याला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील राष्ट्रवादीची विस्कळीत झालेली घडी बसवण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. त्यासाठी लांडे आणि काटे समर्थकांनी आपआपल्या परिने लॉबिंग केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी दि. १८ जून रोजी मतदान, तर दि. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून असून, २ जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. तर अर्ज माघारीची मुदत ४ जूनपर्यंत असणार आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष तथा नगरसेवक योगेश बहल यांना पार्टीने शहराध्यक्ष, नगरसेवक, स्थायी समिती सभापती, सत्तारुढ पक्षनेता, महापौर, विरोधी पक्षनेता अशा सर्व पदांवर संधी दिली आहे. प्रदीर्घ अनुभव असतानाही योगेश बहल पक्षाला सत्तेत आणू शकले नाही. किंबहुना, बहल यांच्यामुळे शहर राष्ट्रवादीत ‘‘स्थानिक-गाववाला आणि बाहेरगावचा’’ असा संघर्ष कायम राहीला. त्यामुळे बहल यांना विधान परिषदेवर संधी दिल्यास पक्ष संघटनेचे पाणीपत होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.

पुण्यातून राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे इच्छुक आहेत. मात्र, त्यांचा ग्रामीण भागात आणि पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वदूर प्रभाव नाही. पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक संदीप वाघेरे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, त्यांच्याकडे अनुभव आणि संघटनात्मक हातोटी दिसत नाही. त्यामुळे नाना काटे आणि विलास लांडे यांच्या नावाला राजकीय वजन प्राप्त झाले आहे.

विधान परिषदेसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून जोरदार तयारी सुरु आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत बैठकांचे सत्र सुरु आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये शिवसेनेला ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एकच जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बैठक पार पडण्याची शक्यता आहे. अशात, अंतिम निर्णय तिन्ही नेत्यांकडूनच घेतला जाणार आहे.

स्वीकृतनंतर विधान परिषदेत ‘मिशन PCMC’

दरम्यान, महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये महेश लांडगे यांना आव्हान देण्यासाठी स्वीकृत नगरसेवकपदावर माजी नगरसेविका सीमा सावळे यांची वर्णी लावण्याची भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी घेतली. महापालिका निवडणूक अत्यंत अतितटीची झाली. त्यामध्ये भाजपाने बाजी मारली. भाजपाचा स्थानिक प्रभावी चेहरा म्हणून महेश लांडगे राष्ट्रवादीच्या रडारवर होते. भाजपा आणि महेश लांडगे यांच्या आक्रमक विरोधक असलेल्या सीमा सावळे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा महेश लांडगे यांची ‘कोंडी’ करण्यासाठी ‘मिशन-PCMC’ ला हवा देण्यात येत आहे. लांडगे यांची कट्टर विरोधक असलेल्या माजी आमदार विलास लांडे यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत विचाराधीन आहे. राष्ट्रवादीतील जेष्ठांची फळी असो किंवा नवी फळी असो लांडे यांचा सलोखा सर्वांशी आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गतवेळी याच जागेवर विलास लांडे यांनी ‘क्लेम’ केला होता. किंबहुना, उमेदवारी अर्जही अपक्ष दाखल केला होता. मात्र, अजितदादांच्या सूचनेनंतर त्यांनी अखेरच्या क्षणी अर्ज माघारी घेतला आणि अनिल भोसले आमदार झाले. आता लांडे यांनी संधी दिल्यास एक अनुभवी मराठा चेहरा पक्षाला पुणे जिल्ह्यात बळकटी देवू शकतो,  ही विलास लांडेंसाठी जमेची बाजू ठरणार आहे.

… म्हणून विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नावाची चर्चा!

दुसरीकडे, दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांची ओळख आहे. अजितदादांचा दौरा शहरात असेल, तर त्यांच्या गाडीमध्ये हमखास नाना काटे दिसणार, असे चित्र होते. तशी जवळीक आणि विश्वास नाना काटे यांनी खासदार पार्थ पवार यांच्यासोबत कामय ठेवला आहे. पार्थ यांच्या सोबतील नाना काटे सावलीसारखे दिसतात. निष्ठावंताला संधी आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी आणि अनुभवी नेत्याला ताकद म्हणून नाना काटे यांचे नाव विधान परिषदेच्या निवडणुकीत विचाराधीन आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल आणि माजी आमदार विलास लांडे असे दोन गट सध्यातरी दिसतात. त्यामुळे या दोन गटांच्या रस्सीखेचमध्ये पक्षाचे राजकीय नुकसान होते. याउलट, नाना काटे यांनी गटा-तटाच्या राजकारणाला कधी थारा दिला नाही. अजित पवार यांच्याशी निष्ठा आणि पार्थ पवारांच्या नेतृत्त्वाला साथ अशी त्यांची राजकीय भूमिका हीच नाना काटेंची जमेची बाजु आहे. संधी कुणाला द्यायची? याचा फैसला आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार करणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button