Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“नैतिकता ही शोभेची नसून, आचरणाची गोष्ट!”; तुकाराम मुंढे

सातारा : हल्ली दुसऱ्याकडे बोट दाखविण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे सगळेच एकमेकांकडे बोट दाखवत राहतात. सरकार, अधिकारी, जनता, कंत्राटदार असा प्रत्येक जण जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो आहे. एकूणच समाजातील नैतिकता हरवली चालली असल्याचे मत प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.

वाई वसंत व्याख्यानमालेच्या ११० व्या वर्षाच्या अखेरच्या सत्राच्या सांगता समारंभात ‘समाज आणि नैतिकता : आजची वास्तवता’ या विषयावर तुकाराम मुंढे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. चिंतामणी केळकर होते.

तुकाराम मुंढे यांनी समाजातील ढासळती नैतिकता, वैयक्तिक जबाबदारी आणि सामाजिक जाणीव यांवर परखड भाष्य केले.

दुसऱ्याकडे बोट दाखवताना पण ही माझीच जबाबदारी आहे असे कोणी म्हणताना दिसत नाही. प्रा. शिवाजीराव भोसले यांच्यासारखे वक्ते होऊन गेले. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र त्यांचे बंधू मुख्यमंत्री असल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी तो पुरस्कार नाकारला. याला नैतिकता म्हणतात. पण आज समाजात नैतिकतेची घसरण होताना दिसते. एखादा नैतिकतेने वागला, तर लोक त्यालाच वेडा म्हणतात. आपण गेल्या महिनाभरात कधी स्वतःला विचारले आहे का, की आपण जे करतो ते योग्य आहे की अयोग्य? ज्याने हा प्रश्न स्वतःला विचारला तोच खऱ्या अर्थाने जिवंत आहे. नैतिकता ही खुंटीला टांगण्याची वस्तू नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा –  पेट्रोल-डिझेलबाबत CM फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश, ‘इंधनाची साठेबाजी करत असेल तर…’

आज आपण नैतिकतेचा केवळ आव आणतो. अपघात झाल्यावर मदत करण्याऐवजी लोक चित्रफीत काढतात. समाजाचा प्रवाह योग्य आहे की अयोग्य हे न पाहता आपण कचऱ्यासारखे वाहवत चाललो आहोत. माणूस म्हणून जगा, कचरा म्हणून नव्हे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवून सैन्यासाठी स्त्रियांविषयी आचारसंहिता तयार केली. ही खरी नैतिकता होती. हिंदवी स्वराज्य म्हणजे सर्व धर्म, स्त्री-पुरुष समान असलेले राज्य. पण आज ‘शिवाजी महाराज व्हावेत, पण दुसऱ्याच्या घरी’ अशी मानसिकता झाली आहे.

समाजातील जबाबदारीबाबत भाष्य करताना ही माझीच जबाबदारी आहे. प्रत्येकाने अशी भूमिका घेतली तर भारत महासत्ता होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. मी सोलापूर जिल्हाधिकारी असताना पंढरपूर मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. भक्त रांगेत उभे असताना देव झोपू शकत नाही असे मला वाटले. त्यावेळी विरोध झाला, पण प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचे धैर्य आवश्यक असते.

त्यांनी प्रशासनातील अनुभव सांगताना म्हटले, मी कोणताही निर्णय घेताना स्वतःला तीन प्रश्न विचारतो. तो कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, नैतिकदृष्ट्या योग्य आहे का आणि त्याचा फायदा सर्वांना होणार आहे का, या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील, तर मी तो निर्णय घेतो. दोन महिन्यांपूर्वी माझी आई वारली. आम्ही कर्मकांड न करता तिच्या अस्थींवर झाड लावले. प्रत्येकाने असे केले तर पर्यावरणाचे अनेक प्रश्न सुटतील. प्रगती म्हणजे केवळ इमारतींची उंची नव्हे, तर नैतिकतेची उंची वाढणे होय. प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा माणूस मूर्ख नसतो; तो धैर्यवान असतो. मी आयएएसमधून निवृत्त होईल, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगत डॉ. केळकर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक अनुराधा कोल्हापुरे, परिचय तनुजा इनामदार यांनी, स्वागत अध्यक्ष डॉ. चिंतामणी केळकर, सूत्रसंचालन आदित्य चौंडे यांनी केले, तर भद्रेश भाटे यांनी आभार मानले. प्रायोजक मयूर व्होरा व अनिल देव यांचा सत्कार तुकाराम मुंढेच्या हस्ते करण्यात आला. व्याख्यानास वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button