भाजपला मागे टाकणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे X हँडल भारतात बंद

मुंबई | गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) या हँडलवर अखेर डिजिटल कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या ६ दिवसांत थेट भारतीय जनता पक्षालाही (BJP) मागे टाकत लाखो फॉलोअर्स कमावणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) हँडल भारतात बंद (Withheld) करण्यात आले आहे. सध्या या हँडलवर ‘Account Withheld’ असा मेसेज येत असून, यामुळे गेल्या काही दिवसांत जोडले गेलेले लाखो फॉलोअर्स आता शून्यावर आले आहेत.
विशेष म्हणजे, हे अकाऊंट बंद होण्याच्या अवघ्या तासाभरापूर्वीच या सोशल गटाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपले सोशल मीडिया हँडल बॅन केले जाऊ शकते, अशी भीती वर्तवली होती.
अकाऊंटवर कारवाई झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करत अभिजीत दीपके म्हणाले, “ज्याची भीती होती तेच झाले. आधी त्यांनी आमचे अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही तेव्हा त्यांनी थेट भारतात ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अकाऊंट बॅन केले. आम्ही काहीही चुकीचे बोललो नव्हतो. आम्ही फक्त मंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. विद्यार्थ्यांनी ज्या आत्महत्या केल्या, त्याची जबाबदारी निश्चित व्हावी ही आमची मागणी होती. त्यावर त्यांनी आमचे अकाऊंटच बंद केले. ही कुठली लोकशाही आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा
राज ठाकरे यांना मोठा दिलासा! २००८ मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी ठाणे कोर्टाकडून निर्दोष मुक्तता
अकाऊंट बंद होण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अभिजीत दीपके यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर वारंवार ‘पासवर्ड रीसेट’चे पॉपअप येत असल्याचे सांगितले होते. त्यांनी संशय व्यक्त केला होता की, “अकाऊंट हॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कारण सोशल मीडियावर आमची लोकप्रियता त्यांच्यापेक्षा जास्त वाढली आहे. जर हॅकिंग जमले नाही, तर ते आमचे अकाऊंट बॅन करतील. महिन्याभरापूर्वीही त्यांनी हेच केले होते. आम्हाला असे कळले आहे की आयबी (IB) व इतर सरकारी संस्था आम्ही काय करतोय यावर लक्ष ठेवून आहेत.” त्यांचा हा अंदाज अवघ्या तासाभरातच खरा ठरला.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना दीपके म्हणाले होते की, “हा राग कोणत्याही एका पक्षाविरुद्ध नसून संपूर्ण सिस्टीमविरोधात आहे. आज भाजप आहे, उद्या दुसरे पक्ष असतील. जर हे राजकीय पक्ष देशातल्या संस्थांचे सार्वभौमत्व सुरक्षित ठेवू शकत नसतील, तर लोकशाही कशी टिकणार? आपल्या देशात नेमकं काय चाललंय? लोकशाही कुठेच अशी चालत नाही. मतदार सरकार निवडत असतात, पण आपल्याकडे सरकार ठरवतंय की कोण मतदान करणार!”





