आळंदी हादरली! घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी | आळंदी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिला मारहाण करत सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ही घटना ७ एप्रिल रोजी घडली. आरोपींनी संगनमत करून पीडितेच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. यावेळी त्यांनी महिलेला बेदम मारहाण केली आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. आरोपींनी केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेचे घर त्यांच्या नावावर करून देण्यासाठी धमकावले. घर नावावर कर, अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा
स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गाच्या कामाला वेग; पहिल्या ‘सेग्मेंट’चे कास्टिंग सुरू
तक्रारीत नमूद केल्यानुसार आरोपी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पीडितेला त्रास देत होते. यापूर्वीही त्यांनी पीडितेच्या घरी येऊन तिचा शारीरिक छळ केला होता. तसेच पीडितेच्या नातेवाईकांशी गैरवर्तन करून त्यांची सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. या छळामुळे पीडित महिला आणि तिचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली होते.
या प्रकरणी पोलिसांनी अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल चोरेडिया, कालिनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे आणि एका महिला आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे आळंदी आणि परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





