यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल होणार

मुंबई : राज्यात सध्या उन्हाळा तीव्र होत असून काही ठिकणी उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना उर्वरित मे महिन्याच्या चिंतेसोबतच यंदाचा पावसाळा कसा असेल याची काळजी लागली आहे. दरम्यान, मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्यासाठी सध्या दक्षिण बंगालच्या उपसागरात तसेच अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेट येथे अनुकूल स्थिती निर्माण झाली असून मोसमी पाऊस या आठवड्याच्या अखेरीस या प्रदेशात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी वर्तविली आहे.
या अंदाजानुसार पाऊस लवकर दाखल झाल्यास अंदमान येथे मोमसी पावसाचे आगमन नेहमीपेक्षा पाच ते सहा दिवस आधी होईल. गेल्यावर्षीचा अपवाद वगळता अंदमान येथे साधारणपणे २२ मेपर्यंत मोसमी पावसाचे आगमन होत असते. गेल्यावर्षी मात्र १३ मे रोजी पाऊस दाखल झाला होता. अंदमानात मोसमी पाऊस स्थिरावल्यानंतर हळूहळू भारताच्या दिशेने सरकतो. केरळमध्ये पावसाचे आगमन साधारण १ जून रोजी होते. त्यानंतर साधारणपणे १० ते १२ दिवसात मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होतो, असे आजवरचे हवामानाचे दाखले आहेत. यंदा देशभरात पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी पाऊस वेळेवर दाखल होणार आहे. सध्या त्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. या आठवड्याअखेरीस अंदमानात मोसमी पाऊस धडकल्यास आणि त्याचा पुढील प्रवासात काही अडथळा उभा न राहिल्यास राज्यात १५ ते २० जून दरम्यान पाऊस दाखल होऊ शकतो.
यंदाच्या पावसावर ‘एल निनो’ चे सावट असेल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने याआधीच आपल्या पहिल्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाजात व्यक्त केली होती. या अंदाजनुसार, या वर्षीच्या हंगामात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला होता. दरम्यान, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मोसमी पावसाचे सुधारित अंदाज जाहीर केले जातात. त्यांनतरच मोसमी पावसाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्रबंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याची माहिती सोमवारी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रणाली सध्या याच प्रदेशात सक्रिय असून पुढील काही काळात ही प्रणाली अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. तसेच या प्रणालीमुळे बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य प्रदेशात चक्रीवादळासारखी वाऱ्यांची गोलाकार स्थिती कायम आहे.





