PCMC: महापालिका आरोग्य वैद्यकीय समितीला मंजुरी
भाजपा नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश; महापौर लांडगे यांची मान्यता, माजी महापौर घोडेकर यांचे अनुमोदन
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये शहरातील वाढत्या आरोग्यविषयक समस्या आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांच्या गरजा लक्षात घेऊन “आरोग्य व वैद्यकीय समिती” स्थापन करण्यास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार असून, आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि लोककेंद्रित होण्यास मदत होणार आहे.
भाजपा नगरसेवक तथा प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. सुहास कांबळे यांनी या समितीच्या स्थापनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मांडणीनंतर आणि सभागृहातील चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला महापौर लांडगे यांनी मान्यता दिली असून, माजी महापौर घोडेकर यांनी त्यास अनुमोदन दिले.
सभागृहात बोलताना डॉ. सुहास कांबळे यांनी सांगितले की, शहरातील सुमारे ४० लाख नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून वाढते नागरीकरण, संसर्गजन्य आजार आणि तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेता स्वतंत्र समितीची स्थापना ही काळाची गरज होती. या समितीमुळे आरोग्य विषयक निर्णय अधिक वेगाने आणि समन्वयाने घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : PCMC: ‘मेट्रो’ला पुन्हा विलंब; अधिकाऱ्यांची बैठक घेणार!
या विषयासाठी योगदान दिलेल्या सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि अभ्यासकांचे त्यांनी आभार मानले. तसेच आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनामुळे या प्रस्तावाला योग्य दिशा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, समितीची रचना, कार्यपद्धती आणि अधिकार निश्चित करण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती तातडीने नियुक्त करावी, अशी मागणीही डॉ. कांबळे यांनी केली आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
“पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला वेळेवर, दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी, हेच आमचे ध्येय आहे. आरोग्य व वैद्यकीय समितीच्या माध्यमातून आपण प्रशासन अधिक गतिमान, समन्वयित आणि लोककेंद्रित करू. हे केवळ एक पाऊल नाही, तर शहराच्या आरोग्य भविष्यासाठी एक ठोस दिशा आहे. या ऐतिहासिक निर्णयाबाबत मी सभागृहाचे आभार व्यक्त करतो.
— डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, भाजपा, पिंपरी-चिंचवड.





