भाजपाचा झंझावात! पाचपैकी तीन राज्यांत कमळ फुलले; पण, पिंपरी-चिंचवडमध्ये विजयोत्सव नाही!
नसरापूर, चाकण अत्याचाराच्या घटनांचा निषेध : शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिले ‘त्या’ मतदारांना धन्यवाद!
पिंपरी-चिंचवड: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, भारतीय जनता पार्टीने यातील पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडेचरी या तीन राज्यांमध्ये ऐतिहासिक यश मिळवत भगवा फडकवला आहे. या दिग्विजयासोबतच महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील राहुरी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कार्डिले आणि बारामती पोटनिवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत प्रचंड मताधिक्याने विजय संपादन केला आहे. या दुहेरी विजयाचा जल्लोष करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरात अत्यंत साधेपणाने विजयोत्सव केला आहे.
नसरापूर आणि चाकण- म्हाळुंगे येथील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतमातेचे प्रतिमा पूजन झाले आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्त्वाचे अत्यंत साधेपणाने अभिनंदन करण्यात आले. पुणे जिल्ह्यात मानवतेला काळींमा फासणाऱ्या घटना घडल्यामुळे ढोल-ताशा आणि गुलाल उधळणे टाळण्यात आले, अशी माहिती शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी यांनी दिली.
यावेळी शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्नबापू काटे, विधान परिषदेच्या आमदार मा. उमाताई खापरे, माजी खासदार श्री. अमरजी साबळे, संघटन सरचिटणीस श्री. मोरेश्वरजी शेडगे, उपमहापौर मा. शर्मिलाजी बाबर, प्रदेश कार्यकारीणी सदस्य श्री. सदाशीवजी खाड्ये, दक्षिण भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. राजेशजी पिल्ले, महिला शहराध्यक्षा सौ. सुजाताजी पालांडे, सरचिटणीस सौ. वैशालीजी खाड्ये, श्री. राजूभाऊ दुर्गे, श्री. मधुकरजी बच्चे यांच्यासह विविध मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“पाचपैकी तीन राज्यांतील जनतेने भाजपाच्या विकासकामांना कौल दिला आहे. तसेच राहुरीच्या जनतेने अक्षय कार्डिले आणि बारामतीकरांनी पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष आम्ही साजरा करणार नाही. कारण, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आणि दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही निवडणूक घ्यावी लागली. तसेच, नसरापूर आणि चाकणमधील अत्याचाराची घटना मन हेलावणारी आहे. त्यामुळे विजयोत्सव केला नाही. केवळ ‘त्या’ मतदारांना धन्यवाद दिले आहेत.
— शत्रुघ्न (बापू) काटे (अध्यक्ष, भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा)






