पिंपरी-चिंचवडमधील संभाजी बारणे यांचा विश्व विक्रम!
शिवचरित्रावरील ५५१ पुस्तकांच्या संग्रहाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

पिंपरी-चिंचवड | साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणारे थेरगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित विविध लेखकांची ९ भाषांतील ५५१ दुर्मिळ पुस्तके संकलित करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची यथोचित नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली असून, त्याचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह २५ मार्च २०२६ रोजी समितीच्या वतीने त्यांना प्रदान करण्यात आले.
मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलुगू, गुजराती आणि सिंधी या भाषांतील शिवचरित्रावर आधारित ग्रंथांचा समावेश या संग्रहात आहे. अशा प्रकारचा एवढा मोठा आणि बहुभाषिक पुस्तकसंग्रह करणारे बारणे हे एकमेव असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
या प्रसंगी अण्णासाहेब मगर सांस्कृतिक फाउंडेशनचे अध्यक्ष गोविंद खामकर, गीतकार बाळासाहेब भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा
दिघीतील सीएमई भिंतीलगत बाधित १४ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी!
बारणे यांच्या या विक्रमामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्चशिक्षित असलेले संभाजी बारणे शेती व बांधकाम व्यवसायात कार्यरत असून सामाजिक उपक्रमांमध्येही ते सातत्याने पुढाकार घेत असतात. त्यांच्या संग्रहात शिवरायांच्या ७० हून अधिक धातूंच्या मूर्ती तसेच केंद्र सरकारने जारी केलेल्या दोन रुपयांच्या शिवरायांच्या नाण्यांच्या सुमारे १५०० प्रतींचा संग्रहही आहे.
थेरगाव येथील त्यांच्या कार्यालयात हे दुर्मिळ संग्रह नागरिकांना दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे. शिवचरित्र संशोधकांना संदर्भासाठी हे ग्रंथ मोफत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वीही बारणे यांनी पिंपरी-चिंचवडमधील १९७८ ते २०२२ या कालावधीतील १२०० नगरसेवकांच्या व्हिजिटिंग कार्ड्सचा संग्रह करून २०१९ मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले होते. तसेच वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांचे आजीव सदस्य असलेल्या बारणे यांनी संपादित केलेल्या “पिंपरी चिंचवड वैभव” या कविता संग्रहाचे नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
“छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील राजा नसून ते विचारांचा अखंड स्रोत आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित विविध भाषांतील ग्रंथ एकत्र करून हा संग्रह तयार करणे ही माझ्यासाठी केवळ आवड नसून एक जबाबदारी आहे. शिवचरित्राचा अभ्यास, जतन आणि प्रसार हीच माझी खरी सेवा आहे. या कार्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली याचा मला अभिमान आहे, पण त्याहून मोठा आनंद म्हणजे हे साहित्य संशोधक आणि शिवप्रेमींना उपयोगी ठरत आहे.”
– संभाजी बाळासाहेब बारणे, शिवप्रेमी.





