ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांवर कारवाई!

महानगर आयुक्त अभिजित चौधरी यांचा इशारा: ३१ मेपर्यंत नालेसफाईची डेडलाईन

पिंपरी-चिंचवड, पुणे | हिंजवडी–माण आयटी पार्क परिसरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर यंदा प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, यापुढे निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.

आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात झालेल्या पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, नियोजनाअभावी पाणी साचल्यास किंवा कोणतीही आपत्ती उद्भवल्यास संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांवर ‘आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत’ थेट जबाबदारी निश्चित केली जाईल.

हिंजवडी–माण आयटी पार्क आणि परिसरात पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यावर तोडगा काढण्यासाठी ३१ मे २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, त्या आधी सर्व पावसाळापूर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बैठकीत नालेसफाईवर विशेष भर देण्यात आला. मुख्य नाले तातडीने मोकळे करणे, त्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, तसेच प्रवाहात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्याचे आदेश देण्यात आले. पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी नैसर्गिक जलप्रवाह अबाधित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

हेही वाचा 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांना मंजुरी

या बैठकीस अनक्लॉग हिंजवडीचे सचिन लोंढे, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कालिदास मांडेकर, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. दुबल, जिल्हा परिषदेचे उपअभियंता श्रीधर फणसे, मुळशीचे वन अधिकारी नंदकुमार शेलार यांच्यासह पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद तसेच एमआयडीसी आणि एनएचएआयचे अधिकारी व हिंजवडी–माण येथील ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे यंदा पावसाळ्यात हिंजवडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्या…

महानगर आयुक्तांनी विविध यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), एमआयडीसी, पीएमआरडीए, संबंधित ग्रामपंचायती आणि पाटबंधारे विभाग यांनी एकमेकांवर जबाबदारी न ढकलता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा, असे त्यांनी बजावले. पावसाळ्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या उपाययोजना राबवण्याचाही निर्णय घेण्यात आला. बैठकीत हिंजवडी परिसरातील पाणी साचणारे ‘ब्लॅक स्पॉट्स’ अधोरेखित करण्यात आले. “पावसाळापूर्व कामांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. निष्काळजीपणामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई निश्चित केली जाईल,” असे डॉ. चौधरी यांनी ठामपणे सांगितले.

“पावसाळापूर्व कामांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. जर तांत्रिक त्रुटींमुळे किंवा नियोजनाअभावी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली, तर संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई निश्चित केली जाईल.”

– डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए.

“हिंजवडी–माण आयटी पार्क परिसरातील पाणी साचण्याचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. केवळ बैठका घेऊन हा प्रश्न सुटणार नाही, तर ठोस आणि वेळेत अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने दिलेली ३१ मेची मुदत ही निर्णायक ठरणार असून, यावेळी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना पावसाळ्यात दिलासा द्यावा, हीच अपेक्षा आहे.”

– सचिन लोंढे, अनक्लॉग हिंजवडी मोहीम.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button