डोनल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार! ट्रम्प सुरक्षित, संशयित ताब्यात

Donald Trump | वॉशिंग्टनमधील वॉशिंग्टन हिल्टन येथे व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डट्स डिनर कार्यक्रमादरम्यान शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची अधिकृत माहिती आहे.
अधिकृत माहितीनुसार, शॉटगन बाळगलेल्या एका व्यक्तीने कार्यक्रमाच्या मुख्य सुरक्षा तपासणी क्षेत्राजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयिताने सिक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळी झाडली; मात्र ती गोळी संरक्षक कवचाला लागल्याने एजंट बचावला. गोळीबाराचा आवाज येताच उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला आणि अनेक पाहुण्यांनी टेबलांखाली आश्रय घेतला.
हेही वाचा
‘देशाच्या प्रगतीमध्ये विधि शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा
सुरक्षा पथकांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, प्रथम महिला मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांना तातडीने बॉलरूममधून बाहेर काढले. तसेच रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर, डग बर्गुम आणि मार्को रुबिओ यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
या प्रकरणातील संशयित आरोपीला जिवंत ताब्यात घेण्यात आले असून हल्ल्यामागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत या घटनेशी इराणचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कार्यक्रमाला सुमारे २,६०० पाहुणे उपस्थित होते. सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी यांनी राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष आणि कॅबिनेट सदस्य सुरक्षित असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती; मात्र सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्यानुसार कार्यक्रम स्थगित करण्यात आला. हा कार्यक्रम पुढील ३० दिवसांत पुन्हा आयोजित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.





