तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योजक बनावे!
सातारा-पुणे महामार्गावर 'हॉटेल अन्नानंद'चा दिमाखदार शुभारंभ

कणेरी मठाधिपतींच्या आशीर्वादाने ‘हॉटेल अन्नानंद’ प्रवाशांच्या सेवेत; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती
सातारा । प्रतिनिधी
“आजच्या काळात तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावे आणि इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात,” हा मोलाचा संदेश देत सातारा-पुणे महामार्गावरील लिंब येथे ‘हॉटेल अन्नानंद’ या भव्य प्रकल्पाचा शानदार शुभारंभ सोमवारी पार पडला.
कोल्हापूरच्या कणेरी मठाचे प. पूज्य श्री समर्थ सद्गुरू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी तरुणांच्या या धाडसी पाऊलाचे कौतुक केले. कणेरी मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजींनी हॉटेल व्यवसायाला आशीर्वाद दिले, तर नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या उपक्रमामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी कुडाळ पंचायत समितीचे सभापती सौरभ बाबा शिंदे यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

हेही वाचा : उधमपूर बस अपघात: दरीत कोसळून १६ जणांचा मृत्यू; अनेक जखमी, बचावकार्य सुरू
तरुणाईचा नवा आदर्श
स्पर्धात्मक युगात सरकारी किंवा खासगी नोकरीवर अवलंबून न राहता सोमनाथ कदम, राजू सावंत, मयूर मोहिते आणि श्रेयश कदम या चार तरुण उद्योजकांनी एकत्र येत हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. ‘अन्नानंद’च्या माध्यमातून केवळ चवदार जेवणच नव्हे, तर परिसरातील तरुणांना काम देण्याचा संकल्प या युवकांनी सोडला आहे, जो आजच्या पिढीसाठी एक नवा आदर्श ठरत आहे.

हायवेवरील प्रवाशांसाठी पर्वणी
सातारा-पुणे हायवे लगत, लिंब येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपा शेजारी हे हॉटेल वसलेले आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि सातारा जिल्ह्यातील खवय्यांसाठी हे एक उत्तम खाद्यसंस्कृतीचे केंद्र ठरणार आहे. या ठिकाणी सर्व सोयीसुविधांनी युक्त आणि स्वच्छ वातावरणात दर्जेदार जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
”व्यवसाय करून स्वावलंबी होण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. या मंगलप्रसंगी मिळालेला मान्यवरांचा आशीर्वाद आणि स्नेह्यांची उपस्थिती आम्हाला भविष्यात नक्कीच बळ देईल.”
— सोमनाथ कदम व सहकारी (संचालक, हॉटेल अन्नानंद)





