टायगरफीस्ट आयडियाथॉन 2026 स्पर्धा : स्टार्टअप संस्कृतीला चालना
शिक्षण विश्व : प्रॉब्लेम स्टेटमेंट स्पर्धा अन् ऑन दी स्पॉट सोल्युशन

पिंपरी-चिंचवड | आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांच्या मार्गदर्शनाखाली “टायगरफीस्ट आयडियाथॉन 2026” ही नाविन्यपूर्ण स्पर्धा पार पडली. “जिथे कल्पनांना पंख मिळतात आणि स्टार्टअप्स सुरू होतात” या संकल्पनेवर आधारित प्रॉब्लेम स्टेटमेंट स्पर्धा आणि ऑन-द-स्पॉट सोल्यूशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन ऑरा इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट, फ्रान्स आणि करियर क्राफ्ट अकॅडमी पुणे यांच्या सहकार्याने करण्यात आले. या कार्यक्रमाला सौमेल व्हेक्टर, बबिता सिरवासा आणि मृत्युंजय हिरेमठ हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करत त्यांच्या कल्पनांचे कौतुक केले.

हेही वाचा : निगडीत ‘आंबा महोत्सवा’चा गोडवा
या आयडियाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी उद्योजकता, तंत्रज्ञान, आरोग्य आणि सामाजिक समस्या या विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण स्टार्टअप कल्पना सादर केल्या. सर्जनशीलता आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचा उत्कृष्ट संगम यावेळी पाहायला मिळाला. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे विशेष कौतुक केले.
उद्योग जगताशी थेट संवादाची संधी…
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली, तसेच त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्याची प्रेरणा मिळाली, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यावहारे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी उद्योजकता सेल प्रमुख डॉ. अनिकेत गरुड यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डॉ. पल्लवी चौधरी, डॉ. भाग्यश्री वारुडे आणि कल्याणी चांदे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संचालन श्रुती मखमले यांनी केले.





