अयोध्येत सैन्य तैनात करा – अखिलेश
![अखिलेश यादव यांच्याशी संबंधीत व्यापाऱ्यावर छापा, 150 कोटी रुपायांची बेनामी मालमत्ता ताब्यात](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/al-qaeda17-vs-akhilesh-ya.jpg)
अयोध्येमध्ये २५ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आणि विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा होणार असल्याने राजकीय वातावरण तापले असतानाच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अयोध्येमध्ये सैन्य तैनात करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, राम भक्तांनी केवळ १७ मिनिटांमध्ये बाबरी मशीद तोडली, असे असताना सरकारला राम मंदिर उभारण्याबाबतचा कायदा करण्यासाठी किती वेळ हवा, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, भाजपचा सर्वोच्च न्यायालयावर अथवा राज्यघटनेवर विश्वास नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेच निर्णय घेऊन तेथे सैन्य पाठविले पाहिजे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तर विश्व हिंदू परिषदेने उत्तर प्रदेशातील विविध भागांमधून लोकांना रेल्वे, बस, ट्रॅक्टर-ट्रॉली, टॅक्सी अशा वाहनांमधून बोलावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मुंबईतून अयोध्येत येणारे शिवसेवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येथील व्यापाऱ्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला होता. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला विरोध केला होता मात्र नंतर अयोध्येतील व्यापाऱ्यांचा विरोध मावळला आहे.
ठाकरे कुटुंबीयही अयोध्येला जाणार
शिवसेना पक्षप्रमुख यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा साधुसंतांच्या हस्ते सत्कार होणार असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले आहेत.