आयसीसीकडून टी-२० वर्ल्ड कपची सर्वोत्तम प्लेइंग ११ जाहीर; चार भारतीय खेळाडूंना स्थान

ICC Team Of The Tournament | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने नुकतीच टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग ११ जाहीर केली आहे. या विशेष संघात विजेत्या भारतीय संघातील चार महत्त्वाच्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांचा लाडका फलंदाज सूर्यकुमार यादव याला या संघात स्थान मिळाले नाही. त्याचबरोबर अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांनाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
या सर्वोत्तम संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम याच्याकडे सोपवण्यात आली आहे. इयान विशन, इऑन मॉर्गन, नतालिया जर्मन्स, आयसीसीचे प्रतिनिधी गौरव सक्सेना आणि समालोचक रेक्स क्लेमेटाईन यांच्या समितीने खेळाडूंच्या कामगिरीचा सखोल आढावा घेऊन हा संघ निवडला आहे.
हेही वाचा : शहरातील मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी महिला ‘एचपीव्ही लसीकरण मोहीम’ सुरू
या प्रतिष्ठित संघात भारताकडून संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे. तसेच अमेरिका संघातील शैडली व्हॅन शाल्विक याची १२वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याने या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी चार फलंदाजांना बाद करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली होती.
आयसीसीने जाहीर केलेल्या या सर्वोत्तम संघात साहिबझादा फरहान, संजू सॅमसन, ईशान किशन, एडन मार्करम (कर्णधार), हार्दिक पंड्या, विल जॅक्स, जेसन होल्डर, जसप्रीत बुमराह, ल्युंगी एन्गिडी, आदिल रशीद आणि ब्लेसिंग मुझरबानी यांचा समावेश आहे. तर शैडली व्हॅन शाल्विक हा १२वा खेळाडू म्हणून निवडण्यात आला आहे.





