Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा भासणार? केंद्राचा मोठा निर्णय; सिलिंडर बुकिंगसाठी नवे नियम

LPG Gas Shortage | पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचे परिणाम भारतातही दिसू लागले असून ७ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. यामुळे देशात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशातील तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच उपलब्ध गॅस पुरवठ्यात घरगुती वापरासाठीच्या एलपीजीला प्राधान्य देण्यास सांगितले आहे.

सरकारने साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी गॅस बुकिंगच्या नियमांतही बदल केले आहेत. यापूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी १५ दिवसांचा कालावधी होता; तो आता २५ दिवसांचा करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना नवीन सिलिंडर बुक करण्यासाठी किमान २५ दिवसांचे अंतर ठेवणे अनिवार्य असेल. या निर्णयामुळे घबराटीत होणारी ‘पॅनिक बुकिंग’ थांबवण्याचा प्रयत्न आहे.

हेही वाचा      :          ‘इराणी जहाजाला भारताचा मदतीचा हात’; परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांची संसदेत माहिती

दरम्यान, आयात केलेल्या एलपीजीचा वापर प्रामुख्याने घरगुती क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात येणार असून रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर उद्योगांसाठी एलपीजी पुरवठ्याबाबत संबंधित प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी सरकारने समितीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतामध्ये दरवर्षी सुमारे ३३ दशलक्ष मेट्रिक टन एलपीजीची मागणी आहे. त्यापैकी जवळपास दोन-तृतीयांश एलपीजी आयातीवर अवलंबून आहे. आयातीतील सुमारे ८५ ते ९० टक्के पुरवठा मध्यपूर्वेतील देशांकडून येतो. त्यामुळे पश्चिम आशियातील परिस्थितीचा भारतावर थेट परिणाम होऊ शकतो.

सरकारच्या माहितीनुसार देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाही. कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या आसपास राहिल्या आणि १३० डॉलरच्या पुढे गेल्या नाहीत, तर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीबाहेरील मार्गांद्वारे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button