अमेरिका–इराण युद्धाचा परिणाम; देशात LPG सिलिंडर महाग

LPG Price Hike | आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. आखाती देशांतील तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम झाला असून त्याचा फटका भारतीय ग्राहकांना बसला आहे. देशभरात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
आजपासून (७ मार्च) १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ११५ रुपयांची वाढ झाली आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपये झाली आहे. मुंबईत सिलिंडरचा दर ९१२.५० रुपये, कोलकातामध्ये ९३९ रुपये तर चेन्नईमध्ये ९२८.५० रुपये इतका झाला आहे.
हेही वाचा : कच्च्या तेलाची सागरी वाहतूक विस्कळीत; महागाईचा धोका
दरम्यान, वर्षभरात घरगुती एलपीजीच्या किमतीत झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे. याआधी एप्रिल २०२५ मध्ये ५० रुपयांनी गॅसचे दर वाढविण्यात आले होते.
घरगुती गॅसबरोबरच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरही महागले आहेत. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ११५ रुपयांनी वाढून १,८८३ रुपये झाली आहे. तर मुंबईत त्याची किंमत १,८३५ रुपये झाली आहे.
गेल्या वर्षभरात व्यावसायिक एलपीजीच्या दरात वारंवार वाढ झाली असून एकूण वाढ ३०० रुपयांहून अधिक झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवरही अतिरिक्त आर्थिक ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





