To The Point : राष्ट्रवादीत सीमा सावळेंना संधी… अजित गव्हाणेंसह माळी समाजाच्या नेतृत्त्वाचा ‘‘करेक्ट कार्यक्रम’’
अजित गव्हाणे यांच्या महापालिका राजकारणाला पूर्णविराम : भोसरी मतदार संघात राष्ट्रवादीला प्रभावी स्थानिक नेता नाही!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील सुस्वभावी आणि शांत व्यक्तीमत्व असलेले माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे यांच्या महापालिका राजकीय कारकीर्दीला आता ‘पूर्णविराम’ मिळाला आहे. स्वीकृत सदस्य पदाच्या माध्यमातून गव्हाणे महापालिकेत प्रवेश करतील आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रतिस्पर्धी आमदार महेश लांडगे यांच्याविरोधातील ‘क्लेम’ कायम ठेवतील, असे सांगितले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी गव्हाणेंच्या हातावर तुरी दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकूण 37 जागा मिळाल्या आहेत. स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादीला 3 सदस्य नियुक्त करण्याची संधी होती. यासाठी राष्ट्रवादीने सीमा सावळे, राजेंद्र जगताप आणि फझल शेख यांचे उमेदवारी अर्ज भरले आहेत. भारतीय जनता पार्टीने स्वीकृत नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ घेतली आहे.
2002, 2007, 2012 आणि 2017 असे चार टर्म अजित गव्हाणे नगरसेवक राहिले आहेत. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात त्यांनी दंड थोपाटले होते. 2024 च्या निवडणुकीत अतितटीच्या लढतीत त्यांना विजयाची अपेक्षा होती. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत महेश लांडगे यांचा विजय झाला आणि गव्हाणे यांना नामुष्कीजनक पराभव झाला होता. त्यांच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदार संघात महेश लांडगे यांना ‘फाईट’ करु शकेल, असा ‘स्ट्राँग’ चेहरा होता. त्यांना ताकद देणे अपेक्षीत होते. राष्ट्रवादीला अजितदादांच्या पश्चात शहरात उभारी देण्यासाठी गव्हाणे सक्षम होते. मात्र, त्यांना स्वीकृत पदाच्या शर्यतीत बाजुला ठेवण्यात आले.
माळी समाजाच्या नेतृत्त्चाचा विचार झाला नाही…
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीदरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांना उमेदवारी दिली नाही. प्रभाग- 2 मधून त्यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती. या ठिकाणी आयात उमेदवाराला संधी देण्यात आली. आल्हाट यांना ’’स्वीकृत सदस्यपदी संधी देवू किंवा राजकीय पुनर्वसन करू..’’ अशा शब्द दिवंगत अजितदादांनी दिला होता. स्वीकृतपदी अर्ज भरण्यासाठी त्यांना कागदपत्रे घेवून महापालिकेत बोलावण्यात आले आणि अखेरच्या क्षणी पुन्हा त्यांच्या नावावर ‘फुली’ मारण्यात आली. आल्हाट यांच्यासह याच प्रभागातील माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात रान पेटवले. पण त्यांनाही पक्षाने संधी दिली नाही. यासह शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले धनंजय आल्हाट यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. कारण, त्यांनी अजितदादांच्या सूचनेनुसार निवडणूक लढवली नव्हती. त्यांनाही संधी मिळाली नाही. स्वीकृत सदस्य नियुक्तीमध्ये राष्ट्रवादीने माळी समाजाला डावलले, असा ‘मॅसेज’ तळागाळात पोहोचला आहे.
विशेष म्हणजे, भाजपात राष्ट्रवादीत दाखल झालेल्या सीमा सावळे यांना उमेदवारी देण्यासाठी इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक 8 मधील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि मूळ ओबीसी समाजाचे उमेदवार विजय लोखंडे यांना उमेदवारीवर पाणी सोडावे लागले. राष्ट्रवादीच्या प्रतिकूल परिस्थितीत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या विजय लोखंडे यांना स्वीकृतपदी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सावळेंच्या ‘एन्ट्री’मुळे लोखंडेच्या नशिबीसुद्धा वनवास आला, अशी राजकीय टिपण्णी केली जात आहे.
राष्ट्रवादीचा माळी समाजाच्या नेतृत्त्वाला विरोध?
शहरातील माळी समाजाचे नेतृत्त्व संपवण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला आहे की काय? असा प्रश्न समाजातून विचारला जात आहे. प्रभाग क्रमांक 1 चिखलीमधून माजी नगरसेवक सुरेश म्हत्रे यांना राष्ट्रवादीचे उमेदवार विकास साने यांनी पराभूत केले. साने मराठा समाजाचे आहेत. भोसरीतील प्रभाग 7 मधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले संतोष लोंढे यांना राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार विलास लांडे यांचे पुतणे विराज लांडे यांनी पराभूत केले. तेसुद्धा मराठा समाजाचे आहेत पण ओबीसी प्रमाणपत्रावर निवडणुकीत उतरले होते. चिंचवड विधानसभा मतदार संघातून सतीश दरेकर यांचे नाव चर्चेत होते. मात्र, माळी समाजाला डावलण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने घेतली आहे.





