प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे काम पूर्ण ; परिसरात राडारोडा पडूनच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/मोरे-राडारोडा१.jpg)
राज्यस्तरीय स्पर्धा सुरु , रसिक प्रेक्षकांची नाराजी
पिंपरी ( महा ई न्यूज) – चिंचवड येथील प्रा रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही अद्याप नाट्यगृहाच्या आवारात राडारोडा पडूनच आहे. नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा मोरे सुरु झाली. मात्र राज्यस्तरीय स्पर्धा सुरु होऊनही नाट्यगृहाच्या आवारात असलेल्या राडारोड्यामुळे कलाकार आणि प्रेक्षकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अनेक रसिक प्रेक्षकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली.
रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे, असे सांगत महापालिकेने १ मे २०१८ रोजी नूतनीकरणाचे काम हातात घेतले होते. नाट्यगृहाचे काम थोडेच असून ते अगदी चार महिन्यांत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मात्र नूतनीकरण सुरु केल्यानंतर चार ऐवजी सहा महिन्यांचा कालावधी यासाठी लागला. त्यानंतर चार नोव्हेंबरला दिवाळी पहाटचा पहिला कार्यक्रम नाट्यगृहात झाला.
रंगमंचाचे आणि प्रेक्षकांसाठीच्या आसनव्यवस्थेचे असे अंतर्गत थिएटरचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रेक्षागृह सुरु करण्याची घाई का केली हा सवाल अद्याप अनुत्तरीत आहे. प्रेक्षागृहाच्या अंतर्गत भागाचे काम झाले. मात्र आवारात राडारोडा आणि जुने साहित्य अजूनही पडून आहे. तसेच काही इतर कामेदेेखील प्रलंबित आहेत. कार्यक्रम घेण्याची घाई केल्यानंतर पहिला कार्यक्रम होऊन १० ते ११ दिवस होऊनही हा राडारोडा स्वच्छ केला नाही.
तब्बल १८ कोटी खर्चून मोरे नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले.
स्थापत्य विभागाला १४ कोटी आणि विद्युत साठी चार कोटी खर्च दाखवण्यात आला. शहरात राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा होणार आहे त्यासाठी नाट्यगृह आरक्षित करण्यात आले आहे. या सगळ्याची माहिती असूनही महापालिकेने नाट्यगृहाच्या आवारातील या राडारोड्याकडे दुर्लक्ष केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेच्य़ा पहिल्या दिवशी नाट्यस्पर्धा सुरु होऊनही एका बाजूला हे स्वच्छतेचे काम सुरुच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्पर्धेसाठी राज्यस्तरातून कलाकार शहरात येतात या स्पर्धेसाठी तरी नाट्यगृहाच्या आवारात स्वच्छता असणे अपेक्षित होते. मात्र परिस्थिती पाहता नाट्यगृहाच्या कामकाजात कोणतेही नियोजन केल्याचे आले नाही.