एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शिक्षण विश्व: साक्षर भारत, तंबाखू मुक्त भारत ही प्रतिज्ञा घेतली

पिंपरी- चिंचवड | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीने सादर केलेल्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी तत्कालीन केंद्र सरकारने लागू केली. या घटनेमुळे भारत देशाच्या सर्व नागरिकांना सन्मान मिळाला. माझ्या सारख्या दिव्यांग व्यक्तीला देखील उद्योग, व्यवसाय करून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या राज्यघटनेचा आपल्याला अभिमान वाटतो असे लघुउद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राजू कडप्पा हिरवे यांनी सांगितले.
सोमवारी प्रजासत्ताकदिनी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त हिरवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

हेही वाचा : कॉमिक्स चॅलेंज स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणी नगर शाळेच्या विद्यार्थिनीचे यश
यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांचा उत्साह…
प्राचार्य डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, स्वर्णिमा कुलकर्णी, अनघा आहेर तसेच पालक, शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. साक्षर भारत, तंबाखू मुक्त भारत ही सार्वजनिक प्रतिज्ञा घेतली. इयत्ता चौथी मधील विद्यार्थी श्रीराम याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील मराठी एकांकिका सादर केली. विद्यार्थ्यांनी परेड, वंदे मातरम् गीत सादर केले. आत्मनिर्भर भारत आणि डिजिटल इंडिया या विषयावर प्रणाली मगर, सान्वी महाले, मधुरा व अन्वी यांनी भाषण केले. डंबेल, योगा, पिरॅमिड याचे प्रात्यक्षिक झाले. रायफल व पिस्तूल शूटिंगचे प्रात्यक्षिक आर्या म्हस्के व ओम पाटील या विद्यार्थ्यांनी केले. “संविधान का जन्म” हे हिंदी नाटक आणि देशभक्तीपर नृत्य सादर केले. शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सूत्रसंचालन ट्रिझा पिटर्स यांनी केले. आभार स्मिता जाधव यांनी मानले.




