विरोधकांनी कर्जमाफीचे राजकारण करू नये – किरीट सोमय्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/सोमय्या.jpg)
पुणे: शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, त्यांना सक्षम करणे हा भारतीय जनता पक्षाचा स्पष्ट उद्देश आहे. त्यामुळे संघर्ष यात्रा काढणाऱ्यांनीच यापूर्वी एकदा कर्जमाफी केली होती. त्याचा फायदा किती झाला, शेतकरी किती सक्षम झाला यासारखे प्रश्न आजही उपस्थित होतात. त्यामुळे विरोधकांनी कर्जमाफीला अवजार बनवत राजकारण करू नये, असे मत खासदार किरीट सोमय्या यांनी मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 6 ते 14 एप्रिल या कालावधीत भारतीय जनता पार्टीने एक अभियान सुरू केले आहे. त्यानिमित्त 24 खासदारांचे एक पथक महाराष्ट्रात दौरे करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते पुण्यात आले असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे आणि शहरअध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने सरकार अभ्यास करत आहे. कर्जमाफी हा सुद्धा त्या अभ्यासाचा एक भाग होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने पाऊले उचलने गरजेचे आहे याची जाणीव आम्हालाही आहे. त्यामुळे यावर्षातच काहीतरी ठोस निर्णय लवकरच घेण्यात येईल. नोटबंदीच्या काळात काळ्याचे पांढरे पैसे करणाऱ्या तब्बल 80 हजाराहून अधिक कंपन्यांविरोधात मोदी सरकारने पाऊले उचलली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. या कंपन्यांकडून 25 ते 50 हजार कोटींची रक्कम वसूल केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने मिळवलेला विजय कौतुकास पात्र आहे. केजरीवालाचा आप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचे सांगत दिल्लीत होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खडसेंबद्दल बोलण्यास नकार
एकनाथ खडसे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात विचारणा केली असता, नायप्रविष्ट प्रकरण असल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला.