प्रभाग ५ मध्ये राष्ट्रवादीचा काँगेसचा प्रचाराची आघाडी
मिशन- PCMC: ‘अजितदादांचे स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी जनतेचा कौल

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात प्रभाग क्रमांक ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार गट) जोरदार मुसंडी मारत आपली ताकद दाखवून दिली आहे. शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चारही उमेदवारांना सोसायट्या आणि वस्त्यांमधून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, संपूर्ण प्रभागात ‘घड्याळा’चा गजर घुमू लागला आहे.
सकाळी अजितभाऊ गव्हाणे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून भव्य पदयात्रेचा प्रारंभ झाला. तुकडोजी महाराज सोसायटी, सत्यनारायण सोसायटी, श्रीकृष्ण सोसायटी, संत ज्ञानेश्वर सोसायटी, गुरुकृपा कॉलनी, नूर मोहल्ला तसेच राष्ट्रप्रेम नगर या भागांत उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
आजवर केलेल्या विकासकामांची पावती जनतेकडून मिळत असल्याचे चित्र दिसून आले. “केलेली कामे आणि दांडगा जनसंपर्क” याच जोरावर नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होत असल्याचे दिसून येत होते. काही ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे कौतुक करत आपला ठाम पाठिंबा जाहीर केला.
हेही वाचा – इंद्रायणीनगर- भोसरी प्रभाग ८ मध्ये ‘राष्ट्रवादी’चा झंझावात

या प्रचारफेरीचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग. अजितभाऊंच्या शिलेदारांना साथ देण्यासाठी तरुण वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनीही “आमचा पाठिंबा सदैव तुमच्या पाठीशी आहे,” असे सांगत उमेदवारांना आशीर्वाद दिले.
‘अजितदादांचे स्वप्न’ पूर्ण करण्याचा निर्धार
अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना महापालिकेत ताकदीने पाठवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. “प्रभागाचा कायापालट करणारी विकासकामे आम्ही केली आहेत. हे व्हिजन पुढे नेण्यासाठी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून आम्हाला विजयी करा,” असा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.





