छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना अर्पण करून मोशीत प्रचार दौऱ्याची सुरुवात
मिशन- PCMC : प्रभाग दोनमध्ये वसंत बोराटे पॅनलला नागरिकांचा वाढता पाठिंबा

पिंपरी-चिंचवड | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्या प्रचार दौऱ्याची मोशी येथे भावनिक आणि पारंपरिक वातावरणात सुरुवात झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस मानवंदना अर्पण करून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यानंतर परंपरेनुसार ग्रामदैवत नागेश्वर महाराज मंदिरात नारळ फोडून प्रचार दौऱ्याचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
मोशीतील विविध भागांतून नागरिकांच्या भेटी, संवाद आणि आशीर्वाद घेत हा दौरा पुढे सरकला. केवळ निवडणूक प्रचार न करता नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, त्यांच्या अपेक्षा समजून घेणे आणि पुढील वाटचालीबाबत संवाद साधणे हा या दौऱ्याचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. “हा दौरा प्रचारापुरता मर्यादित नसून, मोशीसोबत पुढे जाण्याचा संकल्प आहे,” अशी भूमिका वसंत बोराटे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : प्रभाग क्र. १० मध्ये भाजप उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग दोनमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून, या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. वसंत बोराटे यांच्यासह विशाल आहेर, रूपाली आल्हाट आणि अश्विनी जाधव यांचा समावेश असलेला पॅनल अनुभवसंपन्न व जनसंपर्क असलेला मानला जात आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग दोनमध्ये या पॅनलच्या प्रचाराला चांगली सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना स्मरून मोशीतील प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांना न्याय देणे, विकासकामांना गती देणे आणि सर्वसामान्यांचा विश्वास टिकवणे हाच माझा खरा प्रचार आहे. मोशीच्या सोबत राहून, मोशीसाठीच पुढे जाण्याचा माझा ठाम संकल्प आहे.
— वसंत बोराटे, उमेदवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 2.




