सरकारचं पुण्याला मोठं गिफ्ट! पुणे- अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर संरक्षण कॉरिडॉरसह ‘जीसीसी हब’

पुणे : राज्याच्या नवीन उद्योग धोरणात पुण्याला आर्थिक विकासाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी पुण्यातील संरक्षण उत्पादन क्षेत्राला गती दिली जाणार आहे. पुण्यासाठी संरक्षण कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे. याचबरोबर पुण्याला जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) हब बनविण्यात येणार आहे.
राज्य सरकारने नवीन उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण जाहीर केले आहे. त्यात पुण्यासाठी विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. राज्यातील अवकाश आणि संरक्षण उत्पादन परिसंस्थेला चालना देण्यासाठी तीन संरक्षण कॉरिडॉर विकसित केले जाणार आहे. त्यात पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर कॉरिडॉरचा समावेश आहे. याचबरोबर नागपूर, वर्धा, अमरावती, सावनेर आणि नाशिक, धुळे हे आणखी दोन कॉरिडॉर आहेत. विमानतळ, बंदर आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या जाळ्याजवळ असल्याने हे कॉरिडॉर निश्चित करण्यात आले आहेत. त्यातून अवकाश व संरक्षण उत्पादन क्षेत्राला गती मिळणार आहे.
पुण्यातील निर्मितीक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील निर्मिती क्षेत्रातील अनेक कंपन्या पुण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या उत्पादनांची चाचणी आणि गुणवत्ता प्रमाणन पुण्यात केले जाणार आहे. यामुळे उद्योगांचा उत्पादनांच्या चाचणीसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. यासाठी ‘नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिबरेशन लॅबोरेटरीज’ (एनएबीएल) मान्यताप्राप्त चाचणी व गुणवत्ता प्रमाणन प्रयोगशाळा स्थापन केली जाणार आहे. राज्यातील प्रमुख निर्यात समूहांमध्ये या प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार असून, त्यासाठी पुण्याची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा – स्वामी विवेकानंद बालकाव्य मंचाच्या विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित
पुण्यात गेल्या काही वर्षांत बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी) उभारण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र ‘जीसीसी’चे प्रमुख केंद्र बनविण्याचे सरकारचे ध्येय आहे. यासाठी मुंबई आणि पुण्याला जीसीसी हब म्हणून प्रोत्साहन दिले जाणार आहे. याअंतर्गत वेतन अनुदान, करसवलती, संशोधन व विकास, करकपात आणि भांडवली गुंतवणुकीस प्रोत्साहन या गोष्टी सरकार करणार आहे. यामुळे आगामी काळात पुण्यातील ‘जीसीसी’ परिसंस्था आणखी वाढण्यास मदत होणार आहे.
राज्याला नवोन्मेष आणि उद्योजकतेमध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर नेण्यासाठी नवोपक्रम व नवोन्मेष हब स्थापन केले जाणार आहे. पुणे महानगर अथवा नवी मुंबईत सुमारे १०० एकर जागेवर हे केंद्र उभारण्यात येणार आहे. या हबच्या माध्यमातून कृत्रिम प्रज्ञा (एआय), ब्लॉकचेन, जैवतंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या आघाडीच्या क्षेत्रातील नवउद्यमी (स्टार्टअप), इनक्युबेटर, ॲक्सिलरेटर आणि संशोधन व विकास केंद्रांना पाठबळ दिले जाणार आहे. या हबमध्ये नवोन्मेष प्रयोगशाळा, टेक पार्क आणि कार्यालयीन जागा सहकार्य यांचा समावेश असणार आहे, असे धोरणात नमूद करण्यात आले आहे.
पुण्याच्या दृष्टिकोनातून नवीन उद्योग धोरण महत्त्वाचे आहे. पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर संरक्षण कॉरिडॉर, उद्योगांसाठी ‘एनएबीएल’ मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आणि जीसीसी हब यांसारख्या उपक्रमांमुळे पुणे परिसरात औद्योगिक परिसंस्थेला चालना मिळेल. या उपक्रमांतून तंत्रज्ञानाचा स्वीकार उद्योगांमध्ये वाढणार आहे. जागतिक पातळीवर संरक्षण, नवोन्मेष आणि ‘जीसीसी’ केंद्र ही पुण्याची ओळख यामुळे भक्कम होणार आहे, अशी प्रतिक्रिया मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली.





