उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत निहाल आझम पानसरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मिशन- PCMC : ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या माध्यमातून शहरात रणनिती?

पिंपरी-चिंचवड | महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने महत्त्वाची खेळी केली आहे. शहरातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल आझम पानसरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे शहराच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे प्रयत्न सुरू असतानाच निहाल पानसरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आझम पानसरे यांना पिंपरी-चिंचवडमध्ये आजही भक्कम जनाधार असून, विशेषतः अल्पसंख्याक समाज व झोपडीपट्टी भागातील मतदारांवर पानसरे गटाचा प्रभाव कायम आहे. संघटनात्मक ताकद, स्थानिक प्रश्नांवरील पकड आणि थेट मतदारांपर्यंत पोहोच या बाबींमुळे पानसरे गट निर्णायक ठरत आला आहे.
हेही वाचा : राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत नरेंद्र सिंग यांची दिमाखदार कामगिरी
निहाल पानसरे यांच्या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला लक्षणीय राजकीय फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित प्रभागांमध्ये पानसरे गटाची मते निर्णायक ठरू शकतात, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
या घडामोडीकडे अजित पवारांचा पिंपरी–चिंचवडमधील ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणून पाहिले जात आहे. सेक्युलर मतांची विभागणी रोखणे, संघटन बळकट करणे आणि सामाजिक समिकरणे आपल्या बाजूने वळवणे या तिन्ही उद्दिष्टांना एका निर्णयातून साध्य केल्याचे बोलले जात आहे.





