To The Point: भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा कृतितून संदेश ‘‘पार्टी फर्स्ट’’
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे पक्षप्रवेश झाला : सहकाऱ्यांना संधी देता न आल्याची खंत
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीत ‘मेगा प्रवेश’ सुरू आहेत. मात्र, या प्रवेशांमुळे निष्ठावंत आणि पक्षासाठी आठ-दहा वर्षे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संधीवर पाणी सोडावे लागत आहे. मात्र, भाजपाची कार्यप्रणाली ‘‘राष्ट्र प्रथम.. नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:..’’ अशी राहिली आहे. त्यामुळे पक्षासाठी सर्मपण नवीन नाही. याची प्रचिती पुन्हा एकदा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या कृतीतून स्पष्ट झाले.
चिंचवड मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राहुल कलाटे यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाला प्रभाग 25 मधील पक्षाचे कार्यकर्ते किंवा इच्छुक राम वाकडकर, विशाल कलाटे, विनायक गायकवाड, नवनाथ ढवळे, भारती विनोदे यांनी जाहीरपणे विरोध केला. याबाबत पत्रकार परिषदही घेण्यात आली.
वास्तविक, या प्रभागातून राम वाकडकर आणि विशाल कलाटे यांनी भाजपाकडून निवडणुकीची मोठी तयारी केली होती. वाकडकर यांनी ‘ग्रॅड इव्हेंट’ करीत प्रभागातील नागरिकांचे लक्ष वेधले होते. गेल्या काही दिवसांपासून राहुल कलाटे भाजपात येणार अशी कुणकुण होती, ती खरी ठरली.
‘‘वाकड प्रभागात पक्षाचे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे कलाटे यांना आयात करण्याची आवश्यकता नाही’’ अशी भूमिका शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि आमदार तथा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनीसुद्धा पक्षश्रेष्ठींकडे मांडली होती. मात्र, कलाटे यांनी थेट सीएम आणि प्रदेशाध्यक्षांची मनधरणी केली आणि प्रवेशाचा मार्ग मोकळा केला.
दरम्यान, शहराध्यक्ष म्हणून शत्रुघ्न काटे यांच्याकडे नाराज गटाने जोरदार मागणी केली. मात्र, पक्ष नेतृत्वाच्या आदेशामुळे काटे यांना त्यांना साथ देता आली नाही. 2024 मध्ये ज्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्या आमदार शंकर जगताप यांना राहुल कलाटे यांच्या प्रवेशानंतर ‘‘आता आम्ही 125 पार करु..’’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासामोर द्यावी लागली. ती उपरोधिक होती, असे राजकीय जाणकार सांगतात.
व्यक्ती नव्हे, पक्षाला महत्त्व…
दुसरीकडे, राहुल कलाटे यांच्याशी राजकीय वैर नाही. पण, पक्षातील इच्छुकांना न्याय देता येणार नाही, म्हणून धडपड करणारे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना कलाटेंच्या प्रवेश कार्यक्रमात व्यासपीठावर उभा रहावे लागले. कारण, ‘‘पार्टी प्रोटोकॉल’’ मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हा निर्णय मनाविरोधात झाला, हे स्पष्ट जाणवत होते. पण, काटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनांचे पालन करण्यास प्राधान्य दिले. पक्षश्रेष्ठींचा सूचना, पक्षशिष्टाचारापुढे वैयक्तिक मताला प्राधान्य नाही. यामुळे भाजपा आज जगातील सर्वांत लोकशाही पक्ष म्हणून ओळखला जात आहे. या पक्षात व्यक्तीला नव्हे, तर पार्टीला महत्त्व असते, ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली.





