ठाकरे बंधूंची युती झाली, लवकरच जागावाटपाची घोषणा; खासदार संजय राऊत

मुंबई | राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी युती आणि आघाड्यांसाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना ठाकरे बंधूंची युती झाल्याची अधिकृत माहिती दिली.
खासदार संजय राऊत म्हणाले, की महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर या सर्व महापालिकांबाबत आमची चर्चा पूर्ण झाली आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात महापालिकांबाबत काम करत असताना थोडा वेळ लागत असतो. पण विषय मुंबई महापालिकेचा आहे, त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. कारण युतीमध्ये काही नगरसेवकांच्या जागांची आदलाबदल होत असते, त्यामुळे थोडा वेळ लागतो. आता निवडणुकीसाठी उमेदवारांना एबी फॉर्मचं देखील वाटप सुरू करण्यात आलेलं आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने ‘विनिंग कॅन्डिडेट’ गमावला! राहुल कलाटेंचा आज भाजपात प्रवेश!
युतीची अधिकृत घोषणा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी होईल, पण युतीची घोषणा म्हणण्यापेक्षा दोन्ही पक्षाच्या जागावाटपाची घोषणा करण्यात येईल. कारण युती झालेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व आम्ही सर्व एकमेकांशी संवाद साधून आहोत. आता एकनाथ शिंदे आणि भाजपाची युती का झालेली नाही? अजित पवार आणि भाजपाची युती आतापर्यंत का जाहीर झालेली नाही? पण दुसरीकडे आमच्या शिवसेना आणि मनसेमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आम्ही मनापासून एकत्र आलो आहोत, आमच्यात जागावाटपाबाबत कुठेही ताणतणाव नाही, असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.





