माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; दोषत्त्वाचा निर्णय मात्र…

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात क्रीडामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते ॲड. माणिकराव कोकाटे यांची अटक शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे टळली.
सत्र न्यायालयाने कोकाटे यांना केलेली दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवण्याच्या नाशिक सत्र न्ऱ्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि त्यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला.
शिक्षा कायम ठेवल्यानंतर कोकाटे यांना सत्र न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे, दिलासा मिळवण्यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने कोकाटे यांच्या दोषत्त्वाचा निर्णय कायम ठेवला. मात्र शिक्षेला स्थगिती देऊन आणि जमीन मंजूर करून कोकाटे यांना दिलासा दिला.
कनिष्ठ न्यायालयाने कोकाटे यांना त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांत दोषी ठरवले होते व दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे, कोकाटे यांनी दोषत्त्वाला आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने निर्णय देताना, आधीच्या न्यायालयांचे निकाल लक्षात घेता कोकाटे यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच, याच कारणास्तव कोकाटे यांच्या दोषत्त्वाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देऊन शिक्षेचा निर्णय स्थगित करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.





