काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये जाणार?

Pradnya Satav | विधान परिषदेच्या काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यासाठी त्या विधीमंडळ परिसरात दाखल झाल्या होत्या. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला.
राजीनाम्यानंतर प्रज्ञा सातव थेट भाजप कार्यालयात जाणार असल्याची चर्चा असून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी बुधवारी त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त होते. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढल्याने त्यांनी निर्णयातून माघार घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, अखेर आज त्यांनी अधिकृतपणे राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन; भारताच्या शिल्पकलेचा एक युगाचा अंत
प्रज्ञा सातव यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ २०३० पर्यंत होता. त्या २०२४ साली विधान परिषदेवर निवडून गेल्या होत्या. पाच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत पक्षांतराचा निर्णय घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
प्रज्ञा सातव यांचे पती, माजी खासदार राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. सलग दुसऱ्यांदा संधी मिळूनही स्थानिक राजकारणातील समीकरणांचा विचार करत त्यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





