नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

मुंबई | राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. मात्र काही नगरपालिकांमधील मतदान पुढे ढकलल्यामुळे, त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया २० डिसेंबरला आणि मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचा निर्णय झाला होता. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर सर्वच निवडणुकांची मतमोजणी लांबणीवर पडली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आज या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार असल्याचे स्पष्ट केले.
सरन्यायाधीश सूर्य कांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मतमोजमीच्या विषयासंदर्भात सुनावणी पार पाडली. यावेळी खंडपीठाने निवडणुकांचा जो कालावधी निश्चित केला आहे. त्याच्या आत म्हणजेच ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोणत्याही कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होऊ नये, असेही खंडपीठाने सांगितले.
हेही वाचा : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त ते वाहतूक ‘कनेक्टिव्हीटी’साठी 15 मुद्यांवर लक्ष वेधणार!
सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निकाल दिला. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका काही कारणास्तव जर पुढे ढकलल्या गेल्या तर पुन्हा निवडणुकीची प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते. मात्र तरीही २१ डिसेंबर रोजी २ डिसेंबरला झालेल्या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जावा. तसेच उच्च न्यायालयात ज्या याचिका प्रलंबित आहेत, त्यांचा कुठलाही व्यत्यय निवडणूक कार्यक्रमात येता कामा नये, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले.




