‘नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले आणि वैफल्यग्रस्त नेते’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

Chandrashekhar Bawankule : राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पक्ष आपापल्या परीने तयारीला लागेल आहेत. राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. आता प्रचारासाठी केवळ 2 दिवसांचा वेळ शिल्लक राहिल्याने आपापल्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेण्याचा धडाका राज्यातील सगळ्याच पक्षांकडून सुरू आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज बुलढाण्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा झाली. सभा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर देखील टीका केली. चार दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी मंत्री बावनकुळे यांचा उल्लेख ‘वसुलीमंत्री’ म्हणून केला होता. त्याच्या या टीकेला मंत्री बावनकुळे यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी माझ्या बापाचा उल्लेख केला, खरं तर त्यांनी पातळी सोडूनचं राजकारण केलं आहे. असं करून जर ते निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असतील तर तो त्यांना महागात पडेल. असा इशारा त्यांनी दिला होता.
हेही वाचा – भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीत एलपीजी सिलेंडरचा स्फोट
त्यानंतर नाना पटोले यांनी परत एकदा गोंदियातील प्रचारसभेतून बावनकुळेंवर तोफ डागली होती. यासंदर्भात मंत्री बावनकुळेंना विचारले असता त्यांनी नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते आहेत. ते फक्त 200 मतांनी या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेत. त्यांना ते पुढच्या वेळेस निवडून येतील की नाही याची शाश्वती नसल्यानं वैफल्यग्रस्त मानसिकतेतून ते बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातलं हे सरकार 2047 पर्यंत राहणार असून कदाचित यामुळेच काँग्रेस वैफल्यग्रस्त झाली असल्याचं यावेळी ते म्हणाले.
त्याचप्रमाणे राज्यात महायुतीतील पक्षांच्या विविध नेत्यांकडून एकमेकांवर होणाऱ्या आरोपांवर प्रश्न विचारला असता त्यांनी आम्ही युतीधर्म पाळत आहोत. मतभेद आणि मतभेद होणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. मित्र पक्षावर कोणी टीका करायची नाही, सर्वांनी घालून दिलेली बंधनं पाळायची आहेत. स्थानिक पातळीवर काहीही असो, राज्यातील महायुती महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात महायुती आम्हाला टिकवायची आहे. त्यासाठीच आम्ही काम करत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.





