पहिला येईल त्याला प्राधान्याने घर विक्री योजना सिडको कडून जाहीर; ४,५०८ घर मिळविण्यासाठी शनिवारी नोंदणी प्रक्रिया सुरू…

नवी मुंबई : सिडको महामंडळाने तळोजा येथील घर विक्री होत नसल्याने पहिले येईल त्याला प्राधान्य या तत्वाने ४,५०८ घरांच्या विक्री योजना शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये सर्वाधिक २,९७७ घरे ही तळोजातील आहेत. सिडकोच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीची योजना जाहीर केली आहे.
या योजनेची ऑनलाईन नोंदणी शनिवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली नोड्स येथील सिडकोच्या गृहसंकुलातील उपलब्ध घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) प्रधानमंत्री आवास योजना (पीएमवाय) अंतर्गत आणि अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
२२ लाख ते ३६ लाख या दरम्यान या घरांच्या किमती असणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अर्जदारांना इच्छेनुसार घर निवडण्याचे स्वातंत्र्य प्रथमच देण्यात आले आहे.
सिडकोने विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देत असल्याचा दावा केला आहे. या योजनेत ४,५०८ घरे उपलब्ध असून, त्यापैकी १,११५ घरे पीएमएवाय अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी ३,३९३ घरे आहेत. तसेच पीएमवाय अंतर्गत ईडब्ल्यूएस घरांसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान सुविधा उपलब्ध आहे.
हेही वाचा – मर्जीतील चालक, वाहकांचा अतिकालीन भत्ता बंद; एसटी महामंडळ चालक, वाहकांची वर्गवारी करून भत्ते देणार
ही सर्व घरे तयार स्थितीत असून अर्जदारांना इच्छेनुसार घर निवडता येणार आहे. घरे ‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीस आहेत. संपूर्ण रक्कम भरल्यानंतर तात्काळ ताबा देण्यात येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र अर्जदारांना घर निवडण्याची संधी उपलब्ध होईल. ही गृहसंकुले नवी मुंबईतील विकसित नोड्समध्ये असून आवश्यक सुविधांनी सुसज्ज आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ तसेच उपनगरी रेल्वे, मेट्रो आणि महामार्ग सुविधा यांद्वारे उत्कृष्ट जोडणी उपलब्ध आहे.
या योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आली आहे: cidcofcfs.cidcoindia.com. घरांचे क्षेत्रफळ, दर आणि इतर तपशील याच वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन नोंदणी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ४.०० वाजता सुरू होईल. २१ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांसाठी घर निवडीची प्रक्रिया २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होईल.
CIDCOने अर्जदारांना विनंती केली आहे की घरांची विक्री ‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या तत्त्वावर असल्याने निर्धारित वेळेत लवकरात लवकर नोंदणी करून आपल्या घराच्या स्वप्नाची पूर्तता करावी.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
या योजनेत CIDCOच्या गृहसंकुलातील सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी ४,५०८ घरे उपलब्ध आहेत. या योजनेसाठी लॉटरी काढली जाणार नाही, तर अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर निवडण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे ते अक्षरशः आपले स्वप्नातील घर खरेदी करू शकतात. देशातील सर्वाधिक विकसित शहरांपैकी एक असलेल्या नवी मुंबईत घर खरेदी करण्याची संधी CIDCO पुन्हा आणत आहे. अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो.”
– विजय सिंघल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको.





