Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेरुळ शिवछत्रपती स्मारकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार अनावरण

नवी मुंबई : नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण अनेक महिन्यांच्या विलंबानंतर अखेर ठरले असून उद्या (शुक्रवार) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडून यासंदर्भात पत्रक काढण्यात आले असून, शिवप्रेमी आणि स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

रविवारी मनसे नेते अमित ठाकरे यांनी विनापरवानगी पुतळ्याचे अनावरण केल्याने एकच खळबळ उडाली होती. महापालिकेने हे अनावरण अनधिकृत ठरवले. त्यानंतर नेरुळ पोलिसांकडून जमावबंदीचे उल्लंघन व परवानगीशिवाय अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नवी मुंबई राजकारण तापले आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांना रंग चढला होता. त्यानंतर आज, गुरुवारी राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेत घुसून स्मारक जनतेसाठी उघडावे, अशी मागणी करत आंदोलन केले. या सर्वच घटनांमुळे स्मारक राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले होते. तर स्मारकाचे लोकार्पण हे केवळ भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या श्रेयवादामुळे रखडल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता.

हेही वाचा –  डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो मिरा भाईंदरकरांच्या सेवेत होणार रुजू; परिवहन मंत्र्यांनी दिली माहिती

पालिका प्रशासनाने मात्र पुतळ्याभोवतीची कामे पूर्ण होणे आणि काही तांत्रिक तपासण्या आवश्यक असल्याचे सांगत अधिकृत उद्घाटन पुढे ढकलल्याचे कारण दिले होते. आता सर्व कामांची पूर्तता झाल्यामुळे कार्यक्रम ठरवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

त्यामुळे शुक्रवारी, सायंकाळी ५ वाजता शिवस्मारकातील महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या संदर्भातील पत्रक महापालिकेने प्रकाशित केले असून, उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वन मंत्री गणेश नाईक उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार असून, यावेळी स्थानिक खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह माजी नगरसेवक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, इतर मान्यवर आणि मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

उद्या होणाऱ्या या कार्यक्रमामुळे नेरूळमध्ये शिवकालीन इतिहासाच्या स्मरणरंजनासोबतच शिवप्रेमी व स्थानिकांमध्येही चैतन्य निर्माण झाले आहे. दरम्यान, पुतळ्याचे पहिल्यांदा अनावरण केलेले अमित ठाकरे हे देखील उद्या नेरुळ पोलीस स्थानकात आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची प्रत घेण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे उद्या महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button