पक्षानं आम्हाला कोललं तर आम्ही पण पक्षाला कोलणार; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गारटकरांचा इशारा

पुणे | पक्षाने आम्हाला कोललं तर आम्ही देखील कोलल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी इंदापुरातून दिला आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावरून इंदापुरात राजकारण तापलं असल्याचं दिसून येत आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कृषिमंत्री भरणे यांना इशारा थेट दिला आहे.
प्रदीप गारटकर यांनी बैठकीत बोलताना सांगितले की, नेतृत्वाने आमच्या भावना समजून घेतल्या आणि सन्मान दिला, तर आम्ही अजित पवारांसोबत राहू. पण आमचं मत नाकारलं, तर राजीनामा देऊन स्वतंत्र उमेदवारी देण्यास आम्ही मागे हटणार नाही. शेवटच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करू, मात्र अन्याय सहन करणार नाही.
हेही वाचा : महानगरपालिकेने उभारलेल्या आकुर्डीतील खाद्यपदार्थ केंद्राचे ‘सखी आंगण’ असे मराठी नामकरण
आपण आपली ताकद दाखवली तर या शहरात एकतर्फी निवडणूक होऊ शकते. कार्यकर्त्यांचे मत ऐकून सन्मानाने एकत्र पॅनल उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, जर पक्षाने दुर्लक्ष केलं, तर आम्ही सुद्धा कोलल्याशिवाय राहणार नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे १७ तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू. परंतु, पक्षाच्या विरोधात उभं राहावं लागलं तर मी आधी राजीनामा देईन ही माझी नैतिक भूमिका आहे, असं गारटकर म्हणाले.





