सूनबाई अपघात प्रकरणात अडकल्या म्हणून..; ‘मी मोदीभक्त’ म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर ठाकरे गटाची जहरी टीका

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. बोरिवलीत आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींंचं भरभरून कौतुक केलं. इतकंच नव्हे तर ‘मी भाजपचा भक्त आहे आणि मी मोदीजींचा भक्त आहे’, असं ते म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आता राजकीय क्षेत्रातील विविध नेत्यांकडून टीका केली जात आहे. खासदार संजय राऊतांनंतर आता मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महेश कोठारेंवर जहरी टीका केली आहे. अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या म्हणून आता मुक्ताफळं उधळली जातायत, अशी टीका किशोरी पेडणेकरांनी महेश कोठारेंवर केली.
“ते कलाकार आहेत हे बरोबर आहे, पण एका अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या होत्या. तिला कसं वाचवायचं? तर अशी मुक्ताफळं, सुमनं उधळल्याशिवाय काही होत नाही. जी काही संस्कृती तयार होतेय, मी नाव नाही घेणार, कारण कुठल्याही जातीचा मला अपमान करायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं आणि शौर्याबरोबर क्रोर्यही दाखवलंय. मी एवढंच म्हणेन. वेळ येते तेव्हा कलाकारांना बाळासाहेब आणि उद्धवजी आठवतात. त्यांचा निषेध आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया पेडणेकरांनी दिली.
हेही वाचा – ‘मनसे’च्या शिवाजी पार्कमधील दीपोत्सवाचं क्रेडिट महाराष्ट्र सरकारकडून ‘हायजॅक’, ‘मनसे’ची खोचक पोस्ट!
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या ड्राइव्हरने गाडी भरधाव चालवून मेट्रोचं काम करणाऱ्या दोन कामगारांना धडक दिल्याची घटना 28 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री घडली होती. या अपघातात सम्राटदास जितेंद्रदास या कामगाराचा मृत्यू झाला होता, तर उर्मिलासह तिचा ड्राइव्हर गजानन पाल आणि कामगार सुजन रविदास जखमी झाले होते.
याआधी संजय राऊतांनीही महेश कोठारेंवर निशाणा साधला होता. “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात आणि तुमचे चित्रपट फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. तुम्ही असं काही बोलला असाल तर तुम्हाला तात्या विंचू चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल”, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली होती.





