“दैवी शक्तीमुळे हे कृत्य केलं”; सर्वोच्च न्यायालयात बूट फेकणाऱ्या वकिलाचे वक्तव्य

Rakesh Kishore | सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी आपल्या कृतीबाबत कोणताही पश्चात्ताप नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी “दैवी शक्तीमुळे” हे कृत्य केल्याचा दावा केला असून, “मी तुरुंगवास भोगण्यास तयार आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील मयूर विहार येथे राहणारे वकील राकेश किशोर यांनी सांगितले की, त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. खजुराहोच्या जावरी मंदिरातील भगवान विष्णूच्या शिरच्छेद झालेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे ते संतप्त झाले होते.
हेही वाचा : ..तर आम्ही एमआयएमलाही पाठिंबा देऊ; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य चर्चेत
किशोर यांनी सांगितले की, “त्या निकालानंतर मला झोप येत नव्हती. सर्वशक्तिमान देव मला दररोज विचारत होते की, इतक्या अपमानानंतरही मी शांत कसा राहू शकतो.” त्यांनी पुढे म्हटले की, मॉरिशसमधील सरन्यायाधीश गवई यांच्या भाषणानंतर त्यांचा संताप अधिकच वाढला. त्या भाषणात गवई म्हणाले होते की, “भारताची न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमांनुसार चालते, बुलडझरच्या नियमांनुसार नाही.”
किशोर यांनी कबूल केले की त्यांच्या कृत्यामुळे त्यांचे कुटुंबीय नाराज आहेत, परंतु ते म्हणाले, “मी तुरुंगात असतो तर बरे झाले असते.” सर्वोच्च न्यायालयात झालेल्या या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणांकडून घटनेची चौकशी सुरू आहे.




